- शस्त्रक्रियेसाठी तीन लाखाची आहे गरज
- गरीब कुटूंब असल्याने मदतीचे केले आहे आवाहन
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
ओरोस सिद्धार्थनगर येथील उत्कर्षा कृष्णा कदम या तीन महिन्याच्या चिमुकलीच्या हृदयाला छिद्र असल्याने आणि शुद्ध रक्त पुरवठा होत नसल्याने हृदयाची शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. तिचे आईवडील गरीब असल्याने शस्त्रक्रियेचा तीन लाखाचा खर्च करणे शक्मय नसल्याने त्या चिमुकलीला जीवदान मिळण्यासाठी आर्थिक मदत करण्याची गरज आहे.
ओरोस-सिध्दार्थनगर येथील कृष्णा भगवान कदम यांची तीन महिन्याची मुलगी उत्कर्षाला सतत श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता. कणकवली येथील बालरोगतज्ञ डॉ. नितीन शेटय़े यांच्याकडे तपासणी केली असता त्या चिमुकलीच्या हृदयाकडील चार रक्तवाहिन्या एकत्र असल्याने फुफुसाद्वारे शुद्ध रक्त व अशुद्ध रक्त पुरावठय़ाची क्रिया नीट होत नसल्याचे स्पष्ट झाले. अशुद्ध रक्ताचा पुरवठा जास्त होत आहे. हृदयात छिद्र असल्याने शुद्ध रक्ताचा पुरवठा थोडय़ा प्रमाणात होतो. त्यामुळे श्वसनक्रिया जलदगतीने होऊन श्वास घेताना त्रास होत आहे. त्यामुळे उत्कर्षाच्या हृदयाची शस्त्रक्रिया लवकरात लवकर करणे आवश्यक असल्याचे डॉक्टरानी सांगितले. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी तीन लाख रुपये खर्च असल्याचे सांगण्यात आले.
उत्कर्षाची हृदय शस्त्रक्रिया करावी लागणार आहे आणि त्यासाठी तीन लाख रुपये खर्च येणार आहे, असे समजताच उत्कर्षाचे वडील कृष्णा यांना धक्काच बसला. मोलमजुरी करून पोट भरणाऱयांनी एवढे पैसे आणायचे कुठून आणि शस्त्रक्रिया तर करावीच लागणार आहे, असा प्रश्न पडला आहे. हसत्या खेळत्या तीन महिन्याच्या चिमुकलीला आपल्याला काय होतंय हे कळत पण नसेल, पण तिच्यावर शस्त्रक्रिया केल्यास निश्चितच तिला जीवदान मिळेल. ती हसेल खेळेल बागडेल म्हणून आज तिची शस्त्रक्रिया करण्यासाठी आर्थिक मदत करणे अत्यंत आवश्यक आहे.
यासाठी सिंधुदुर्ग जिल्हय़ातील दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे करण्याची गरज आहे. त्यासाठी उत्कर्षाचे आजोबा भगवान नागेश कदम यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सिंधुदुर्गनगरी नवनगर शाखेच्या बँक खाते क्रमांक – 33387770837, IFSC -SBIN0004511 नंबरवर पैसे जमा करावेत किंवा तरुण भारत कार्यालय सिंधुदुर्गनगरी-ओरोस या कार्यालयात मदत जमा करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी भगवान कदम यांच्याशी (8482824613) संपर्क साधवा.









