जिल्ह्य़ात शाळाबाहय़ मुले शोधमोहीम गतीमान : कोरोनाने स्थलांतरीत झालेली मुले येताहेत शिक्षण प्रवाहात
प्रतिनिधी / रत्नागिरी
शाळाबाहय़ विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाने हाती घेतलेल्या सर्वेक्षणात गेल्या 3 दिवसात 44 हजार 5 कुटुंबांना शिक्षकांनी भेटी दिल्या. त्यावेळी 13 मुले शाळाबाह्य आढळली असून परराज्यातून विविध कामांसाठी आलेल्या कुटुंबांचा यात समावेश असल्याचे सांगण्यात आले.
शिक्षण विभागाकडून ही शाळाबाहय़ मुलांची शोधमोहीम 10 मार्चपर्यंत चालणार आहे. शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार जिह्यातील एकही मुल शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी शासन आदेशानुसार शाळाबाह्य शोधमोहीम राबवली जात आहे. मोहीम 1 मार्चपासून सुरू झाली आहे. यावेळी गेल्या 3 दिवसात 44 हजार 5 कुटुंबांना शिक्षकांनी भेटी दिल्या आहेत. त्यातील 13 मुले शाळाबाह्य आढळली आहेत. त्यामध्ये 6 मुले व 7 मुलींचा समावेश असून 2 मुले ही दिव्यांग आहेत.
तसेच परजिल्हय़ातून रत्नागिरी जिल्ह्य़ात 185 मुले स्थलांतरीत आढळली आहेत. पण ती अगोदरच शिक्षणाच्या प्रवाहात आहेत. त्यांनी पूर्वीच जवळच्या शाळांमध्ये प्रवेश घेऊन ठेवला आहे. यापूर्वी स्थलांतरीत होऊन आलेल्या 17 जणांनी पुन्हा परजिह्यात जाणे पसंत केले आहे. ग्रामीण तसेच शहरी भागामध्ये प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांमार्फत ही मोहीम प्रभावीपणे राबवली जात आहे. शहरी भागातील झोपडपट्टी परिसरात शाळाबाह्य मुलांची संख्या अधिक लक्षात घेत रत्नागिरी शहरातील कोकणनगर परिसरात सर्वाधिक लक्ष केंद्रीत केले आहे. या मोहिमेत काही शिक्षकांनी कोरोनाचे कारण देत घराघरात जाऊन सर्व्हे करण्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
जिल्ह्य़ात शाळाबाहय़ मुलांच्या सर्वेक्षणाची आकडेवारीः
- तारीख शाळाबाह्य मुले स्थलांतरीत मुले
- 1 मार्च 2 20
- 2 मार्च 9 108
- 3 मार्च 2 57









