24 तासांत आढळले 41 कोरोनाग्रस्त : एकूण रुग्णसंख्या 794
प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोनाग्रस्तांचा आलेख चढताच असून शनिवारी राज्यात 41 नवे रुग्ण आढळून आले आहेत. मागील तीन दिवसात तब्बल 101 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या 794 वर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत 377 जण संसर्गमुक्त झाले आहेत. तर 386 जणांवर उपचार सुरू आहेत. 30 कोरोना रुग्णांचा बळी गेला आहे तर एकाने आत्महत्या केली आहे.
राज्यात शनिवारी एकूण 41 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामध्ये बेंगळूर शहर जिल्हय़ातील 12, कारवार जिल्हय़ात (भटकळ) 8, दावणगेरेत 6, तुमकूरमध्ये 4, बिदर, मंगळूर आणि चित्रदुर्गमध्ये प्रत्येकी 3 तसेच विजापूर आणि चिक्कबळ्ळापूरमध्ये प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. याच दरम्यान मागील 24 तासात 10 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मंडय़ा जिल्हय़ातील 3, म्हैसूर, गुलबर्गा आणि बेंगळूरमधील प्रत्येकी 2 आणि तुमकूरमधील एक रुग्ण संसर्गमुक्त झाला आहे.
बेंगळूरमध्ये रुग्ण क्रमांक 419 च्या संपर्कात आलेल्या पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्वजण पादरायनपूर वॉर्डातील रहिवासी आहेत. कोरोना योद्धय़ांवर हल्ला करणाऱयांमध्ये त्यांचा सहभाग होता, असे समजते. त्याचप्रमाणे दावणगेरेत शनिवारीही कोरोनाने थैमान घातले असून 6 नव्या रुग्णांची भर पडली आहे. रुग्ण क्रमांक 651 च्या संपर्कात आलेले 5 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. कारवार जिल्हय़ातील कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या भटकळमध्ये पुन्हा 8 कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तुमकूरमध्ये 4 तर चित्रदुर्गमध्ये एकाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामधील अनेक जण गुजरातमधील अहमदाबादवरून परतले होते. ते दिल्लीतील तबलिग जमातच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
कोरोनाग्रस्त गर्भवतीने दिला मुलीला जन्म
बेंगळूरमधील सीलडाऊन करण्यात आलेल्या पादरायनपूर येथील कोरोनाबाधित गर्भवतीने शुक्रवारी रात्री मुलीला जन्म दिला आहे. गर्भवती प्रसूत होताच बाळाला मातेपासून विलग करून उपचार सुरू करण्यात आले आहेत. बाळाला मातेमुळे कोरोनाचा संसर्ग झाला आहे का, हे अद्याप समजलेले नाही. या बाळाचे स्वॅब प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असून डॉक्टरांना अहवालाची प्रतीक्षा आहे. 34 वर्षीय कोरोनाग्रस्त महिला व्हिक्टोरिया इस्पितळात प्रसूत झाली. सध्या बाळाला दुधाची पावडर दिली जात आहे. जन्मताच बाळाचे वजन 3 किलो भरले आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
वाणी विलास इस्पितळातील वैद्यकीय कर्मचाऱयांचे काम बंद आंदोलन
कोरोनाग्रस्त महिला आणि तिचे कुटुंबीय इस्पितळात मुक्तपणे वावरत आहेत. त्यामुळे भयभीत झालेल्या बेंगळूरच्या वाणी विलास इस्पितळातील डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचाऱयांनी आपण काम करणार नाही, अशी भूमिक घेऊन शनिवारी आपला मोर्चा इस्पितळबाहेर वळविला. हे इस्पितळ ‘नॉन कोविड इस्पितळ’ आहे. त्यामुळे आरोग्य खात्याने येथील वैद्यकीय कर्मचाऱयांना पीपीई किटवितरीत केलेले नाही. आपल्याला कोरोना वॉरियर्सच्या यादीतही समाविष्ट करण्यात आलेले नाही. सरकारला आपल्या कारोग्याची काळजी नाही, अशी नाराजी व्यक्त करून येथील कर्मचाऱयांनी आंदोलन सुरू केले आहे.








