ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना संकटाचा सामना करताना भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीस लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. त्या पॅकेजमधून गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्थलांतरित मजुरांसाठी विशेष पॅकेजची तसेच मजूर, शेतकरी, फेरीवाल्यांसाठी आर्थिक पॅकेजची घोषणा केली.
त्या म्हणाल्या, वर्षभरात तीन कोटी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या कर्जाचा लाभ मिळाला आहे. यामध्ये तीन कोटी शेतकऱ्यांना 4 लाख कोटी पेक्षा अधिक कर्ज दिले आहे. यामध्ये कृषी क्षेत्रात मार्च आणि एप्रिल मध्ये 63 लाख कर्ज मंजूर करण्यात आले. यात शेतीसाठी 86 हजार 600 कोटींचे कर्ज दिले गेले आहे. कार्पोरेेट आणि ग्रामीण बँकांसाठी मार्च 2020 मध्ये नाबार्ड ने 29 हजार 500 कोटी रुपयांची पुनर्रचना केली. तर ग्रामीण क्षेत्रात विकासासाठी राज्यात मार्च महिन्यात 4200 कोटी रुपये उपलब्ध करून दिले गेले आहेत. तसेच 50 लाख फेरीवाल्यांसाठी 5000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
तसेच 31 मे पर्यंत शेती कर्जाच्या व्याजावर सूट देण्यात आली आहे. गेल्या महिन्यात 25 लाख किसान क्रेडिट कार्ड देण्यात आली.
स्थलांतरित मजुरांची केंद्र सरकारला काळजी असून मजुरांच्या मजुरीतील तफावत दूर केली जाईल. त्या म्हणाल्या, प्रवासी मजुरांना दोन महिने मोफत धान्य दिले जाईल. याचा फायदा आठ कोटी मजुरांना होणार आहे. या मजुरांना मनरेगा योजनेतून दररोज 200 रुपये दिले जाणार आहेत, असे ही त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच मजुरांची वर्षातून एकदा आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. शहरातील बेघरांची 3 वेळची जेवणाची सुविधा करण्यात आली आहे. त्याच बरोबर सर्व मजुरांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. रेशन कार्ड नसलेल्यांना 5 – 5 किलो गहू, तांदूळ आणि चणा दिला जाणार आहे. तसेच महिलांना रात्री काम करण्याची मुभा दिली आहे.
पुढे त्या म्हणाल्या, गेल्या दोन महिन्यात 7200 नवीन बचत गटांची निर्मिती करण्यात आली. तसेच बारा बचत गटांकडून तीन कोटी मास्कची निर्मिती केली गेली आहे. बचत गटांनी 1 लाख 20 हजार लिटर सॅनिटायझरची देखील बनवले आहे. असे ही सीतारामन यांनी यावेळी सांगितले.









