ऑनलाईन टीम / सातारा :
केरळमधील एका बँकेचे तीन कोटी रुपयांचे सोने चोरल्याप्रकरणी नाशिकमधील मुख्य संशयित आरोपीसह त्याच्या साताऱ्यातील तीन मित्रांना ताब्यात घेण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री केरळ आणि सातारा पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली असून, ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींना केरळला नेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केरळमधील एका बँकेचे तीन कोटी रुपयांचे सोने चोरीस गेले होते. या प्रकरणाचा तपास केरळ पोलिसांकडून सुरू असताना या गुन्ह्यातील सुत्रधार निक जोशी (मूळ. रा. नाशिक) हा सातारा परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार केरळ पोलिसांचे एक पथक शुक्रवारी सकाळी साताऱ्यात दाखल झाले. त्यांनी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट घेऊन गुन्ह्याची माहिती दिली. त्यानुसार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे चार पोलीस केरळ पोलिसांच्या मदतीसाठी पाठवले.
निक जोशी याचा तांत्रिक सहाय्याने शोध घेतला असता तो साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात एका हॉटेलमध्ये आपल्या दोन साथीदारांसह तसेच कोरेगाव तालुक्यातील एका मित्रासमवेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकून जोशी याच्यासह साताऱ्यातील तीन मित्रांना ताब्यात घेतले. जोशी याच्याकडून एक अलिशान चारचाकीही जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, जोशी याच्या साताऱ्यातील मित्रांचा या गुन्ह्यात समावेश आहे की, नाही हे अद्याप समोर आले नाही.









