रिव्हॉल्व्हरच्या धाकाने रोकड, युएस डॉलर पळविले : आठ जणांना अटक, चौघे फरारी : सूत्रधाराचा शोध सुरू
प्रतिनिधी /बेळगाव
तीन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी मूळचा मोटारीमने, मलवळा, ता. यल्लापूर, जि. कारवार व सध्या रा. हुबळी येथील एका युवकाचे बेळगाव येथून अपहरण करण्यात आले आहे. उशीरा हे प्रकरण उघडकीस आले असून रिव्हॉल्वरचा धाक दाखवून 55 हजार रुपये रोख रक्कम, 1 हजार युएस डॉलर आदी लाखो रुपयांचा ऐवज अपहरणकर्त्यांनी पळविला आहे. या प्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे.
चिटगुप्पी पार्क, हुबळी येथील रविकिरण नागेंद्र भट्ट (वय 34) या युवकाने दिलेल्या फिर्यादीवरुन एपीएमसी पोलीस स्थानकात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रविंद्र गडादी, मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी आदी वरि÷ अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसी पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे.
पोलिसांनी पाळली गुप्तता
पंधरा दिवसांपूर्वी ही घटना घडली आहे. आठ दिवसांपूर्वी संशयितांची धरपकड झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुप्तता पाळली आहे. कोणत्या कारणासाठी हे प्रकरण गुपीत ठेवण्यात आले? याचा उलगडा झाला नाही. एपीएमसीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ, उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत.
उपलब्ध माहितीनुसार या प्रकरणी आठ जणांना अटक झाली आहे. आणखी चौघे जण फरारी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अपहरणानंतर त्या युवकाला खानापूरपासून सुमारे 10 कि.मी. अंतरावरील एका फार्महाऊसवर ठेवण्यात आले होते. त्याने स्वतःची सुटका करुन घेऊन गाव गाठले आहे. अपहरणानंतर रवीकिरणच्या पत्नीशी संपर्क साधून 3 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे.
रवीकिरण भट्ट हे पुणे, नाशिक येथे देवदर्शनाला जाण्यासाठी केए 25 एमआय 9955 कारमधून 13 जानेवारीच्या रात्री 8 वाजता हुबळीहून बेळगावला आले. बेळगावजवळील एका रिसॉल्टमध्ये त्यांचे वास्तव्य होते. दुसऱया दिवशी 14 जानेवारी रोजी सकाळी चन्नम्मा सर्कलमार्गे ते केएलई हॉस्पिटलकडे निघाले. दुपारी 12.15 वाजण्याच्या सुमारास एका दुचाकी चालकाने कारच्या ग्लासला धडकून कार उभी करण्यास सांगितले. त्यानंतर चार-पाच जणांनी रवीकिरण यांना घेरले.
तुझ्यामुळे अपघात झाला आहे, जे नुकसान झाले आहे त्याचा खर्च दे, अशी मागणी त्यांनी केली. माझ्यामुळे ही घटना घडली नाही तुम्हीच येऊन धडकला आहात. हवे तर तुम्ही पोलिसांत फिर्याद द्या, असे रवीकिरण यांनी सांगितले. तोपर्यंत दोघे ते तिघे जण कारमध्ये चढले. शिवबसवनगरजवळ मोटार सायकलवरुन आणखी एक जण आला. रिव्हॉल्वरचा धाक दाखवत 20 लाख रुपये मागण्यात आले.
रवीकिरण यांना त्यांच्याच कारमधून खानापूरजवळील एका पोल्ट्री फार्मवर नेण्यात आले. एका खुर्चीवर बसवून त्यांचे हातपाय बांधण्यात आले. तोंडात बोळा कोंबून मोबाईलचा पासवर्ड मागितला. त्यांनी देण्यास नकार दिल्यामुळे पत्नीचा क्रमांक मागवून घेतला. त्यांच्या जवळील 55 हजार रुपये रोख रक्कम, 1 हजार युएस डॉलर (75 हजार रुपये), 75 हजार रुपये किमतीचे ऍपल कंपनीचे घडय़ाळ, 25 हजार रुपये किमतीचे ऍपल एअरपोड, 5 पेडिट कार्ड व तीन डेबिट कार्ड, कारमधील चांदीचा गणपती, लक्ष्मीचे चित्र असलेले सोन्याचे नाणे व 11 लाख रुपये किमतीची कार अपहरणकर्त्यांनी पळविली आहे.
कसेबसे स्वतःची सुटका करुन घेऊन दुसऱया दिवशी 15 जानेवारी रोजी रवीकिरण यांनी यल्लापूर गाठले. पत्नीची भेट घेऊन घडला प्रकार सांगितला. त्यावेळी त्यांच्या सुटकेसाठी अपहरणकर्त्यांनी पत्नीकडे 3 कोटी रुपये खंडणी मागितल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितले. नहून त्यांचा खून करण्याची धमकी देण्यात आली होती. 18 जानेवारी रोजी या संबंधी एपीएमसी पोलीस स्थानकात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आठ जणांना अटक
या प्रकरणी पोलिसांनी गद्देरसुल आसीम खाजी (वय 27, रा. रेलनगर, बेळगाव), आरीफ इब्राहिम मुल्ला (वय 27, रा. आझादनगर), बदरुद्दीन आयुब मुल्ला (वय 30, रा. न्यू गांधीनगर), नूरअहम्मद उर्फ राजू महम्मदअली कल्लूर (वय 30, रा. न्यू गांधीनगर), याहीया जाकरीया कटगेरी (वय 23, रा. पिरनवाडी), जुबेर रशीद पिरजादे (वय 27, रा. अरळीकट्टी, देशपांडे गल्ली), रेहान रियाज सय्यद (वय 35, रा. रविवारपेठ, खानापूर), नासीफ नवाजखान पठाण (वय 23, रा. काकर गल्ली-बेळगाव) यांना अटक करण्यात आली आहे. यापैकी पाच जण रिअल इस्टेट व्यावसायिक आहेत. आणखी चौघे जण फरारी असून त्यांना अटक केल्यावर बरीच माहिती उघडकीस येणार आहे.
क्रिप्टो करन्सी व्यवहारातून घटना?
रवीकिरण भट्ट यांचे अपहरण बहुचर्चित क्रिप्टो करन्सी व्यवहारातून झाले आहे का? असा संशय निर्माण झाला आहे. या दिशेने चौकशीची चपे फिरविण्याची गरज आहे. कारण अपहरणानंतर रवीकिरण यांच्या पत्नीशी संपर्क साधून 3 कोटींची खंडणी मागण्यात आली आहे. क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारातून रवीकिरण यांच्या अपहरणाचा कट रचून त्यासाठी बेळगाव येथील तरुणांचा वापर झाला आहे. या मागचा सूत्रधार कोण? याचा सुगावा लागला नाही. फरारी असलेल्या चौघा जणांना अटक झाल्यानंतर सुत्रधाराविषयी माहिती मिळणार आहे.









