60 लाखांचा ऐवज जप्त : चिकोडी पोलिसांची कारवाई : लिफ्टच्या बहाण्याने पळवत होते ट्रक

प्रतिनिधी /बेळगाव
लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने ट्रक पळविणाऱया आंतरराज्य गुन्हेगारांच्या टोळीला चिकोडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून 35 लाखांचे टायर व 25 लाख रुपये किमतीची बिस्किटांनी भरलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत. जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी ही माहिती दिली आहे.
चिकोडीचे पोलीस निरीक्षक आर. आर. पाटील व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. अबिद जुम्मेखान (वय 32) रा. झारोखडी, हरियाणा, अश्विन शांतीलाल जैन (वय 42) रा. पाडीन, जि. शिरोही, राजस्थान, रिजवान नुरुद्दीन बिसंबरा (वय 22) रा. बिसंबरा, जि. मथुरा, उत्तरप्रदेश अशी अटक करण्यात आलेल्या तिघाजणांची नावे आहेत.
10 ऑक्टोबर 2021 रोजी अनुसिंग जयचंद्रसिंग यांनी आपला ट्रक चोरीला गेल्याची फिर्याद चिकोडी पोलिसात दाखल केली होती. लाखो रुपयांच्या वस्तूंनी भरलेल्या ट्रकचा शोध घेता घेता चिकोडी पोलीस आंतरराज्य गुन्हेगारांच्या टोळीपर्यंत पोहोचले. सुमारे 35 लाख रुपये किमतीचे सियाट कंपनीचे टायर, 25 लाख रुपये किमतीची कॅडबरीची बिस्किटे जप्त करण्यात आली.
उपलब्ध माहितीनुसार अटक केलेले तिघेही ट्रकचालक आहेत. चोरलेला माल उतरविण्यासाठी कणबर्गीजवळ त्यांनी एक शेड उभे केले आहे. माल उतरविल्यानंतर कंटेनर चिकोडी तालुक्मयातील कब्बूर क्रॉसजवळ सोडून देण्यात आला होता. या कंटेनरमध्ये 1 हजार 308 टायर होते.
‘आपण मुंबईला जाणार आहे. बसची सोय नाही’, असे सांगत टायरने भरलेल्या कंटेनरमधून त्यांनी लिफ्ट घेतली. खरेतर चेन्नईमध्ये ते कंटेनरमध्ये बसले होते. या त्रिकुटावर विश्वास ठेवून चालकाने त्यांना बसवून घेतले. नंतर त्यांनी ट्रकच पळविला. या टोळीतील त्रिकुटाच्या चिकोडी पोलिसांनी मुसक्मया आवळल्या आहेत.
गुंगीचे औषध देऊन लुबाडणूक
या टोळीच्या गुन्हेगारीची पद्धत वेगळी आहे. महामार्गावर लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने ते एखादा ट्रक किंवा कंटेनर अडवतात. त्यामधून जाता जाता चालकाला चहातून झोपेच्या गोळय़ा देतात. चालकाला गुंगी यायला लागली की ट्रकचा ताबा स्वतःकडे घेतात. त्या वाहनातील माल विकून नंतर वाहनाचीही विक्री केली जाते.









