अचूक बातमी “तरुण भारत” ची, मंगळवार, 22 जून 2021, सकाळी 11.30
● जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 6.69 ● 11,724 जणांचे नमुने तपासले ● जिल्ह्यात 2,920 बेड शिल्लक ● मृत्यू दर घटल्याचा दिलासा ● गर्दी तर होणारच आहे, नियम पाळूया
सातारा / प्रतिनिधी :
मे महिन्यातील गंभीर स्थिती जून महिन्यात सावरताना दिसत आहे. जून महिन्याच्या आरंभापासून बाधित वाढीचा दोन हजारांचा रतीब बंद झाला. तो पुढे आठशेच्या पटीत येऊ लागला. गेले काही दिवस तो कमी-जास्त होत असला तरी तीन अंकावर स्थिर आहे. काल 461 जणांचा अहवाल समोर आला. बाधित वाढीची संख्या कमी आल्याने दिलासा वाटला होता. मात्र, सोमवारी रात्रीच्या अहवालात पुन्हा 788 जणांचा अहवाल बाधित आलेला असून 800 चा रतीब बंद करण्यासाठी सर्वांना हा प्रयत्न करावे लागणार आहेत. यामध्ये मात्र पॉझिटिव्हिटी दर लक्षणीयरित्या खाली आलेला असून, त्यामुळे बेडसाठी होणारी पळापळ थांबलेली आहे.
गर्दी तर होणारच आहे, नियम पाळूया
जिल्ह्याची स्थिती सावरत आहे. लॉकडाऊनमध्ये शिथीलता मिळाल्याचा दिलासा असतानाच जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठांमध्ये गर्दी होत असल्याचा सूर आळवला जात आहे. मात्र बाजारपेठा सुरू झाल्या, जगरहाटी सुरू झाली की काही वेळ गर्दी की होणारच आहे. एवढ्या लोकसंख्येमध्ये गर्दी हा विषय न टाळता येणार आहे. मात्र यापुढे नागरिकांनी गर्दीत देखील नियम पाळून स्वतःसह कुटुंबाचा, समाजाचा कोरोना पासून बचाव करण्यासाठी करण्यासाठी सतर्क राहायला हवे हे निश्चितच.
जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 6.69
सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार 11,742 जणांचे नमुने तपासण्यात आल्यानंतर 788 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे. यामध्ये जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 6.69 नमूद करण्यात आलेला आहे. गेली आठ दिवस सलगपणे जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर देखील नऊ टक्क्यांच्या आसपास राहिलेला होता. तो सलग तीन चार दिवसापासून सात टक्के एवढा खाली आलेला आहे. मंगळवारी तो त्याहीपेक्षा दिलासादायकरित्या खाली आलेला आहे.
जिल्हय़ात 2,920 बेड रिक्त
आजमितीस जिल्हय़ात कोव्हिड हॉस्पिटल्समध्ये 4,860 एकूण बेड संख्या आहे. यामध्ये प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1,940 एवढी असून हॉस्पिटलमध्ये 2,896 बेड रिक्त आहेत. कोव्हिड हॉस्पिटल्समध्ये आयसीयू व्हेंटीलेटरसह 79 बेड, आयसीयू व्हेंटिलेटरविना 249, ऑक्सिजनसह 2,047 बेड आणि ऑक्सिजनविना 545 असे 2,920 बेड रिक्त आहेत.
सोमवारी 1,935 जण लस लाभार्थी
जिल्हय़ात लसीकरणाचा वेग मंदावलेला असला तरी उपलब्ध साठय़ानुसार लसीकरण सुरु आहे. लसीकरणाची आकडेवारी कासवाच्या गतीने वाढत असून सोमवारी 1,935 जणांना लस देण्यात आली आहे. त्यामुळे पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 6 लाख 80 हजार 449 झालीय. तर दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या 1 लाख 44 हजार 142 झाली असून एकूण लस घेतलेल्यांची संख्या 8 लाख 24 हजार 591 एवढी झालीय.
सोमवारपर्यंत जिल्हय़ात एकूण नमूने 9,86,888, एकूण बाधित 1,86,336, एकूण कोरोनामुक्त 1,74,432, मृत्यू 4,221, उपचारार्थ रुग्ण 8,408
सोमवारी जिल्हय़ात बाधित 461, मुक्त 1,139, बळी 17