प्रतिनिधी / सांगली
खानापूर तालुक्यातील गाजलेल्या हिवरे तिहेरी खूनप्रकरणी दोन्ही आरोपींना मंगळवारी शिक्षा सुनावली जाणार आहे. या प्रकरणी सुधीर घोरपडे (वय 24) आणि रवींद्र कदम (वय 23) अशी दोषी धरण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोन्ही आरोपींनी अत्यंत प्रुरपणे आणि निर्दयीपणे खून केला असून त्यांना फक्त आणि फक्त मृत्युदंडच देण्यात यावा अशी मागणी सरकारी पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांनी केली. दरम्यान आरोपींच्या चांगल्या वागणुकीचा दाखला देऊन त्यांना शिक्षा कमी करावी अशी मागणी आरोपींचे वकील ऍड. प्रमोद सुतार यांनी केली. हा खटला जिल्हा सत्र न्यायाधीश डी. पी. सातवळेकर यांच्यासमोर सुरू आहे. ते याचा निकाल देणार आहेत.
या खून खटल्याची पार्श्वभूमी अशी की, यातील एक आरोपी सुधीर घोरपडे रा. मतकुणकी याने आपल्या बहिणीच्या खुनाचा बदला खून म्हणून या तीन महिलांचा खून केला आहे. असा युक्तीवाद ऍड. निकम यांनी केला. त्यांनी या आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा देण्यासाठी एकूण पाच मुद्दे मांडले. त्यामध्ये या आरोपींच्या मनात सहा वर्षापासून खून का बदला खून ही आग धुमसत होती. त्यांनी अत्यंत थंडपणे आणि निर्दयीपणे या महिलांचे खून केले आहेत. तसेच हे खून करताना त्यांनी पध्दतशीरपणे कट रचला होता.अत्यंत थंड डोक्याने हे खून केले आहेत. निशस्त्र असणाऱया महिलांना कोणताही प्रतिकाराची संधी यामध्ये मिळाली नाही. त्यामुळे हा खून हा ‘हलाल का झटका’ अशा स्वरूपाचा आहे. त्यामुळे या खुनातून आरोपींना फक्त आणि फक्त सूड घ्यावयाचा होता हे सिध्द होते. त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
आरोपी सुधीर घोरपडे याची बहीण विद्याराणी हिचे लग्न शिंदे कुटुंबीयांत झाले होते. लग्नानंतर तिचे सासराचे लोक तिचा छळ करत असलयाचा तिच्या माहेरच्यांचा आरोप होता. दरम्यान, विद्याराणी हिने आत्महत्या केली होती. ही आत्महत्या नसून खून आहे. तिला सासरच्या लोकांनीच मारले आहे. अशी फिर्याद तिच्या माहेरच्यांनी सासरच्या लोकांविरोधात दिली होती. या खटल्यातुन शिंदे कुटुंबीयांची निर्दोष सुटका झाली होती. त्यानंतर सुधीर घोरपडे हा शिंदे कुटुंबीयांच्यावर चिडून होता.
21 जून 2015 रोजी सुधीर घोरपडे, रवींद्र कदम हे दोघेजण शिंदे राहतात त्या वस्तीवर गेले आणि त्यांनी जमीन मोजण्याच्या बहाण्याने घरात गेले यावेळी या वस्तीवर कोणीही पुरूष मंडळी नव्हती. तिन महिला होत्या. या महिलांकडून या दोघांनी पाणी मागण्याचा बहाणा केला. त्यामध्ये एक महिला पाणी आणण्यासाठी गेली असता दारात असणाऱया निशिगंधा शिंदे, सुनीता पाटील यांच्यावर चाकूने वार करून त्यांचा खून केला आणि त्यानंतर पाणी आणायला गेलेल्या प्रभावती शिंदे या बाहेर आल्यावर त्यांच्यावरही या दोघांनी हल्ला केला अणि ते पळून गेले. या हल्यात या तीन्ही महिला जागीच गतप्राण झाल्या. या घटनेनंतर शेजारच्या लोकांनी या दोघांना पळून जाताना पाहिले होते. त्यानंतर त्यांनी याची माहिती शिंदे कुटुंबीयांना देण्यात आली. त्यानंतर याबाबत विटा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. सरकारी पक्षातर्फे ऍड. उज्ज्वल निकम आणि त्यांना सहाय्य सरकारी वकील उल्हास चिप्रे हे करत आहेत.
महापुरात आरोपी पळून गेल नाहीत
आरोपींना न्यायालयाने दोषी धरल्यानंतर त्यांना कडक शिक्षा करण्यात यावी अशी मागणी ऍड. निकम यांनी केली. पण, या मागणीनंतर आरोपीचे वकील ऍड. प्रमोद सुतार यांनी हे आरोपी बदलले आहेत. कारागृहात ज्यावेळी पाणी शिरले होते. त्यावेळी या महापुरातून पळून जाण्याची संधी होती. तरीसुध्दा ते पळून गेले नाहीत. त्यांनी उलट पळून जाणाऱया आरोपींना पकडले त्यामुळे त्यांचा सत्कार कारागृहाने केला असल्याचे सांगत त्यांना कमीत कमी शिक्षेची मागणी केली. पण हा मुद्दाही सरकारी पक्षांने खोडून काढत जेलरने तसा कोणताही अहवाल दिला नसल्याचे न्यायाधीशांना सांगितले.








