डंपर-दुचाकींमध्ये अपघात : रायबाग तालुक्यातील महिला, युवकाचा मृत्यू
वार्ताहर / रायबाग
तालुक्यातील रायबाग-निडगुंदी मार्गावर झालेल्या तिहेरी अपघातात दोघेजण ठार झाल्याची दुर्घटना बुधवारी घडली. सदर अपघात डंपर व दुचाकींमध्ये घडला. पुनम खैराम तळवार (वय 25) व बाळाप्पा कुमार कांबळे (वय 22, दोघेही रा. बोमनाळ) अशी मृतांची नावे आहेत. अपघातानंतर डंपरने पेट घेतल्याने मोठे नुकसान झाले.
याबाबत समजलेली माहिती अशी की, रायबागहून निडगुंदीकडे डंपर जात होता. यावेळी निडगुंदीहून बोमनाळकडे पुनम तळवार ही स्कुटीने जात होती. निडगुंदीनजीक पुनम हिचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीची समोरून येणाऱया डंपरला धडक बसली. यात पुनम हिचा जागीच मृत्यू झाला. यावेळी डंपर चालकाने अचानक गाडी थांबविल्याने डंपरच्या मागून येणाऱया दुचाकीची डंपरला धडक बसली.
दरम्यान अपघातानंतर डंपरने काही क्षणातच पेट घेतला. यावेळी डंपर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. डंपरला मागून धडक दिल्यानंतर बाळाप्पा याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला त्या मार्गावरून जाणाऱया अन्य प्रवासी व ग्रामस्थांनी रुग्णालयात दाखल केले.
तसेच डंपरला आग लागल्याची घटना अग्निशमन दलाला कळविण्यात आली. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.
बोमनाळमध्ये एकच हळहळ
रायबाग पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दरम्यान बाळाप्पाचा इस्पितळात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या तिहेरी अपघातात बोमनाळ येथील महिला व युवक ठार झाल्याने हळहळ व्यक्त होत होती. या अपघातात डंपरसह दोन दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद रायबाग पोलीस स्थानकात झाली आहे.









