तीन दिवसात गुंतवणूकदारांची 6 लाख कोटीची कमाई
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवडय़ामध्ये सेन्सेक्समधील तेजीचा प्रवास सलग तिसऱया दिवशीही कायम राहिल्याचे दिसून आले आहे. यामध्ये सेन्सेक्स 790 अंकांनी वधारला असून जागतिक पातळीवरील मजबूत संकेतामुळे आर्थिक कंपन्यांच्या समभागांच्या लिलावामुळे बाजार तेजीमध्ये राहिल्याची नोंद केली आहे.
दिवसभरातील कामगिरीनंतर दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 789.70 अंकांसह 1.61 टक्क्यांनी वाढून निर्देशांक 49,733.84 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 211.50 अंकांच्या मजबूतीसह 1.44 टक्क्यांच्या वाढीसोबत निर्देशांक 14,864.55 वर बंद झाला आहे. यामध्ये चालू आठवडय़ातील सलग तीन दिवसांच्या कालावधीत सेन्सेक्समधील गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी रुपयाची कमाई केली असल्याची माहिती आहे.
प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीत सेन्सेक्समधील बजाज फायनान्सचे समभाग सर्वाधिक म्हणजे 8 टक्क्यांनी मजबूत राहिले आहेत. यासोबतच इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, स्टेट बँक, बजाज ऑटो आणि एचडीएफसी बँक यांचे समभाग तेजीसह बंद झाले आहेत. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी नेस्ले इंडिया, एचसीएल टेक, लार्सन ऍण्ड टुब्रो, डॉ.रेड्डीज लॅब आदी समभाग घसरणीसोबत बंद झाले आहेत.
अन्य घडामोडींचा प्रभाव
चौथ्या तिमाहीमधील विविध कंपन्यांचे नफा कमाईचे अहवाल सादर केले जात आहेत. तसेच देशात कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रभावासोबत लसीकरणानेही वेग पकडला असल्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास मजबूत होत गेल्याने सलग तिसऱया सत्रातही सेन्सक्सचा तेजीचा प्रवास कायम राहिल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.
प्रमुख क्षेत्राचे योगदान
सेन्सेक्समधील बुधवारच्या तेजीसोबत गुंतवणूकदारांनी जवळपास 2.1 लाख कोटी रुपयाची कमाई केली असल्याने अनेक समभाग मजबूतीमध्ये राहिले आहेत. यामध्ये प्रमुख क्षेत्रातील बँक आणि वाहन कंपन्यांच्या समभागात मजबूत विक्री झाल्यामुळे भारतीय बाजाराला मोठी उंची प्राप्त करण्यास यश मिळाले असल्याचेही अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे.









