महापालिकेकडून जागृती : शहरात विनामास्कधारकांवर कारवाई, मॉल- हॉटेलना भेटी देऊन सामाजिक अंतर राखण्याची सूचना

प्रतिनिधी /बेळगाव
राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तसेच नाईट कर्फ्यूदेखील लागू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेनेदेखील खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यास प्रारंभ केला आहे. याअंतर्गत शहरात विनामास्क कारवाई करण्याबरोबरच मॉल आणि विविध हॉटेलना भेटी देऊन सामाजिक अंतर राखण्याची सूचना करण्यात येत आहे.
राज्यात कोरोनाच्या तिसऱया लाटेस प्रारंभ झाला असून ओमिक्रॉन बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यास राज्य शासनाने प्रारंभ केला आहे. कोरोनाबांधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बेंगळूरमध्ये दररोज 2 हजारांहून अधिक कोरोनाबाधित सापडत असल्याने हा आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे नाईट कर्फ्यू आणि विकेंड कर्फ्यूची घोषणा राज्य शासनाने केली आहे. तसेच कडक निर्बंध लादण्याच्यादृष्टीने विचार विनिमय सुरू आहे. मात्र सध्या ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शनिवार-रविवार कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना नियंत्रणाच्या दृष्टीने महापालिकेनेदेखील पाऊले उचलण्यास प्रारंभ केला आहे. सध्या शहरात विनामास्क फिरणाऱयांची संख्या वाढली आहे. त्याचप्रमाणे बाजारपेठ, मॉल अशा विविध ठिकाणी खरेदीसाठी गर्दी होत आहे. सध्या हॉटेल व सिनेमा हॉल आदी खुले ठेवण्यात आल्याने गर्दी होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे गर्दी टाळण्याच्या दृष्टीने महापालिकेने जागृती मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारपासून विविध मॉल आणि सिनेमा हॉल, हॉटेल यांना भेटी देऊन सामाजिक अंतर राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे अशा विविध सूचना करण्यात येत आहेत.
2 हजारांहून अधिक दंड जमा
मंगळवारी दिवसभर बाजारपेठेत तसेच विविध चौकात थांबून मास्क वापरण्याचे आणि सामाजिक अंतर राखण्याचे आवाहन करण्यात आले. विविध चौकात थांबून वाहनचालकांना मास्क वापरण्याची सूचना महापालिकेच्या कर्मचाऱयांनी केली. तसेच बुधवारी सकाळी एपीएमसी, भाजीमार्केट, फळ मार्केट व फूल मार्केटमध्ये जागृती मोहीम राबविण्यात आली. तसेच विनामास्क फिरणाऱया नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. यावेळी 2 हजारांहून अधिक दंड जमा करण्यात आला.









