प्रतिनिधी/ बेळगाव
तिसऱया रेल्वे फाटकावर उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येत आहे. मात्र लॉकडाऊनचा फटका उड्डाणपुलाच्या उभारणीला बसला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हे काम बंद ठेवण्यात आले असून काम सुरू करण्याकडे रेल्वे खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी तिसरे रेल्वे फाटक परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होऊन वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. उड्डाणपुलाचे काम कधी पूर्ण होणार आणि रस्ता वाहतुकीसाठी कधी खुला होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरात विकासकामे राबविण्यात येत आहेत. तिसरे रेल्वे फाटकावर उड्डाणपुलाची उभारणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या तिसरे रेल्वे फाटक परिसरात निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेता स्मार्ट सिटी की भकास सिटी असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. कोरोना विषाणूमुळे सर्वच विकासकामांना खिळ बसली आहे. ठिकठिकाणी रस्त्यांची खोदाई करण्यात आल्याने रस्ते वाहतुकीस बंद आहेत. परिणामी नागरिकांना याचा फटका बसत आहे. रेल्वे उड्डाणपूल उभारणीचे कामही अर्धवट अवस्थेत असून शहरवासियांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. झारखंड आणि बिहार येथील कामगार उड्डाणपुलाचे काम करीत होते. पण लॉकडाऊनमुळे सर्व कामगार घरी परतल्याने काम बंद असल्याची माहिती रेल्वे खात्याच्या अधिकाऱयांनी दिली होती. गेल्या सहा महिन्यांपासून रेल्वे उड्डाणपुलाचे काम बंद असून अर्धवट अवस्थेत असलेल्या कामाचा फटका नागरिकांना बसत आहे.
तिसरे रेल्वे फाटक परिसरात एकतर्फी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. तिसऱया रेल्वे फाटकावरून शहरात येण्याचा रस्ता बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे वाहनधारकांना दुसऱया रेल्वे फाटकमार्गे यावे लागत आहे. तिसरे रेल्वे फाटक परिसरात वाहनांची गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडीमुळे अर्धवट असलेले उड्डाणपुलाचे काम कधी मार्गी लागणार, अशी विचारणा होत आहे. रेल्वे उड्डाणपुलाचे काम करणारे स्वगृही गेलेले परप्रांतिय कामगार अद्याप परतले नाहीत. त्यामुळे उड्डाणपुलाच्या उभारणीचे काम सुरू करण्यात आले नाही. सदर काम रखडले आहे. लॉकडाऊन पूर्णपणे शिथिल करण्यात आल्याने सर्व कामकाज सुरळीत सुरू झाले आहे. मात्र उड्डाणपुलाचे कामकाज सुरू करण्यात आले नाही. कामगार आल्यानंतरच उड्डाणपुलाच्या कामाला प्रारंभ होणार आहे.









