सिटीझन्स कौन्सिलची जिल्हाधिकाऱयांकडे मागणी : कंत्राटदाराचे दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
तिसरे रेल्वेगेट येथील उड्डाणपुलाचे काम 2019 मध्ये सुरू करूनही अद्याप अर्धवट स्थितीत आहे. मागील काही महिन्यांपासून काम पूर्णपणे बंद आहे. यामुळे एका बाजूचा रस्ता सुरू असून सकाळी व संध्याकाळी प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. कंत्राटदाराच्या दुर्लक्षामुळे तिसऱया रेल्वेगेट परिसरातून येणे-जाणेही जीवघेणे ठरत असल्याने या उड्डाणपुलाचे काम लवकर पूर्ण करा, अशी मागणी सिटीझन्स कौन्सिलतर्फे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
शहराचे प्रवेशद्वार म्हणून तिसरे रेल्वेगेट ओळखले जाते. या रेल्वेगेटवर उड्डाणपूल उभारण्याच्या कामाला मागील दोन वर्षांपासून प्रारंभ झाला आहे. दोन वर्षात अत्यंत धिम्यागतीने काम सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळात कामगार नसल्याने काम बंद ठेवले होते. परंतु
लॉकडाऊनमध्ये इतर वाहतूक बंद असल्याने काम सुरू ठेवणे गरजेचे होते. सरकारच्या आदेशानुसार लॉकडाऊनमध्ये महत्त्वाची सरकारी कामे सुरू ठेवण्याचे आदेश असतानाही उड्डाणपुलाचे काम ठप्पच आहे. शहरातील कामगारांना उद्यमबागमधील कारखान्यांमध्ये कामाला जाण्यासाठी तिसऱया रेल्वेगेटमार्गे जावे लागते. परंतु केवळ एकाच बाजूने वाहतूक सुरू असल्याने सकाळी व संध्याकाळी प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. या परिसरात इंजिनिअरिंग कॉलेज, हॉस्पिटल, औद्योगिक वसाहत असल्याने कंत्राटदाराच्या दुर्लक्षामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना खोदाई केल्याने यामध्ये पडण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे उड्डाणपुलाचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी निवेदन स्वीकारून तिसरे रेल्वेगेट येथे कायमस्वरुपी रहदारी पोलिसांची नेमणूक केली जाईल, असे सांगितले. खोदाई केलेल्या परिसरात बॅरिकेड्स लावण्याच्या सूचना पोलिसांना करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सिटीझन्स कौन्सिलचे अध्यक्ष सतीश तेंडोलकर, सेवंतीलाल शहा, ऍड. एन. आर. लातूर, अरुण कुलकर्णी, दीपक अवर्सेकर, निवृत्त रेल्वे अधिकारी एस. सुरेश व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱयांकडून रेल्वे अधिकारी धारेवर
तिसरे रेल्वेगेट येथील उड्डाणपुलाचे काम रखडल्यामुळे नागरिकांना होणाऱया समस्यांची माहिती कौन्सिलच्या सदस्यांनी जिल्हाधिकाऱयांना दिली. याची दखल घेऊन तात्काळ जिल्हाधिकाऱयांनी रेल्वेचे हुबळी येथील बांधकाम विभागाचे मुख्य अभियंते टी. विष्णुभूषण यांना फोन केला. उड्डाणपुलाचे काम रखडले जात असल्याने नाराजी व्यक्त करत त्यांनी रेल्वे अधिकाऱयांना धारेवर धरले. ऑक्टोबरअखेर दिवसरात्र काम करून उड्डाणपुलाचे काम पूर्ण करावे, असा आदेश जिल्हाधिकाऱयांनी दिला. येत्या दोन दिवसात तिसरे रेल्वेगेट उड्डाणपुलाची आपण स्वतः पाहणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.









