बसेस जाग्यावर… खासगी वाहने रस्त्यावर, प्रवाशांची गैरसोय
प्रतिनिधी / बेळगाव
विविध मागण्यांसाठी परिवहन कर्मचाऱयांनी पुकारलेला संप अद्याप मागे न घेतल्याने सलग तिसऱया दिवशीही बससेवा ठप्प झाली आहे. बसेस बंद असल्याने प्रवाशांची संख्या देखील रोडावलेली पहायला मिळत आहे. शासनाने ‘एस्मा’ जारी करण्याचा इशारा दिला असला तरी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचे दिसत आहे. दरम्यान प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी खासगी वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे परिवहनच्या बसेस जाग्यावरच थांबलेल्या असल्यातरी खासगी वाहने प्रवाशांसाठी रस्त्यावर फिरताना दिसत आहेत.
मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात कोणत्याही प्रकारचे आंदोलन होवू नये, याकरिता 144 कलम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे परिवहनच्या कर्मचाऱयांना ठिय्या आंदोलनाला बसणे अडचणीचे झाले आहे. दरम्यान कर्मचारी बससेवेत हजर न होता. घरी राहूनच या संपाला प्रतिसाद देत आहेत. राज्याला बेळगाव परिवहन विभागातून मोठय़ा प्रमाणात महसूल मिळतो. बेळगावात एकूण सात विभाग असून बेळगाव विभागाच्या चार आगारासह रामदुर्ग, सौंदत्ती, बैलहोंगल, खानापूर या आगारांचा यामध्ये समावेश आहे. या आगारातून दररोज 250 हून अधिक बसेस आंतरराज्य प्रवासासाठी विविध मार्गावर धावत असतात. तर एका बेळगाव विभागातून दररोज 620 हून अधिक बसगाडय़ा स्थानिक व लांबपल्ल्यासाठी धावत असतात. शिवाय वातानुकुलित बसेस रात्रीच्या वेळी लांबपल्ल्यासाठी विविध शहरांकडे धावतात. मात्र आता गेल्या तीन दिवसांपासून सर्वच बस जाग्यावर थांबून आहेत. परिणामी बेळगाव विभागाला गेल्या तीन दिवसापासून दररोज अंदाजे 60 लाखाहून अधिक फटका बसला आहे.
परिवहन कर्मचाऱयांनी सहावा वेतन आयोग लागू करावा, यासह इतर मागण्यांसाठी संप पुकारला आहे. त्यामुळे बससेवेवर मोठा परिणाम झाला आहे. शासनाने यापूर्वी परिवहनच्या कर्मचाऱयांना सरकारी कर्मचारी म्हणून दर्जा देण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यामुळे कर्मचाऱयांनी आक्रमक भूमिका घेत आपल्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या प्रवाशांना कर्मचाऱयांच्या संपाचा तिढा कधी संपणार? अशी चिंता लागू राहिली आहे. परिवहन कर्मचाऱयांनी डिसेंबर महिन्यादरम्यान विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन छेडले होते. दरम्यान राज्य सरकारने कर्मचाऱयांच्या काही मागण्या मान्य केल्या होत्या. आता कर्मचारी उर्वरित मागण्यांसाठी पुन्हा एकदा संपावर गेले आहेत.
खासगी वाहनांना अच्छे दिन
गेल्या तीन दिवसांपासून परिवहनचे कर्मचारी संपावर गेल्याने सरकारी बससेवा ठप्प झाली आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बसस्थानकात खासगी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. खासगी वाहनांना सुलभ प्रवासी मिळत असल्याने खासगी वाहनांसाठी अच्छे दिन आले आहेत. खासगी वाहनांना बसस्थानकात परवानगी देण्यात आल्याने प्रवाशांची सोय होत आहे. मात्र काही खासगी वाहनधारक प्रवाशांकडून अधिक भाडे घेवून लूट करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बस बंदचा फटका देखील प्रवाशांना बसत आहे.
महाराष्ट्र महामंडळाला फटका
कर्नाटक परिवहन मंडळाच्या कर्मचाऱयांनी संप पुकारल्याने बससेवा ठप्प झाली आहे. त्याबरोबरच खबरदारी म्हणून महाराष्ट्र महामंडळाच्या बसेस देखील कर्नाटकात दाखल झाल्या नाहीत. त्यामुळे कर्नाटक परिवहनच्या कर्मचाऱयांनी पुकारलेल्या संपाचा फटका महाराष्ट्र महामंडळाने देखील बसला आहे. महाराष्ट्राच्या विविध आगारातून कर्नाटकात धावणाऱया बसची संख्या अधिक आहे. या माध्यमातून महामंडळाला महसूल मिळतो. मात्र कर्नाटकात पुकारलेल्या संपामुळे कर्नाटक-महाराष्ट्र आंतरराज्य बससेवेवर परिणाम झाला आहे.









