प्रतिनिधी / मडगाव
‘कोविड-19’ या संसर्ग जन्य रोगापासून बचाव करण्यासाठी सारे जग सद्या धडपडत आहे. त्यात ‘सोशल डिस्टन्सिंग’ (सामाजिक अंतर) यावर अधिक भर देण्यात आलेला आहे. जुवारी नदीच्या सांकवाळ खाडीत तिसऱया व कालवे पकडताना आदर्श असे सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात आहे. सांकवाळ येथील तिसऱया व कालवे संपूर्ण गोव्यात प्रसिद्ध आहेत.
सांकवाळ येथील लाईटहाऊसच्या जवळ समुद्राला सुकती आली की असंख्य महिला तिसऱया व कालवे पकडण्याचे काम दररोज करतात. या ठिकाणी सापडणारी तिसऱया व कालवे स्वादीष्ट असल्याने, संपूर्ण गोव्यात त्यांना प्रचंड मागणी असते. सद्या लॉकडाऊन असल्याने तिसऱया व कालवे पकडणाऱयाची संख्या वाढली आहे. अनेक युवक देखील आत्ता तिसऱया व कालवे पकडण्यासाठी या ठिकाणी येतात.
स्थानिक महिला आपल्या दररोजच्या जेवणात तिसऱया व कालवाचा वापर करतात, त्याच बरोबर वास्को, कुठ्ठाळी, आगशी व मडगावच्या बाजारपेठेत आणून त्याची विक्री करतात. त्यावर त्यांची रोजीरोटी चालत असते. ‘नॉन व्हेज’ असलेल्या गोवेकरांच्या जेवणात तिसऱया व कालवे हमखास असतात.
कालवे काढण्याचे काम तसे बरेच त्रास दायक असते. नदीच्या पात्रातील दगड फोंडून त्यात असलेली कालवे काढावी लागतात. त्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागतात. समुद्राची सुकती-भरती पाहूनच कालवे काढावी लागतात. सद्याच्या लॉकडाऊनच्या काळात कोरोना व्हायरसच्या भीतीने अनेकांनी घरातच राहणे पसंत केले आहे. मात्र, ग्रामीण भागातील लोक मात्र हुशार झाले असून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून स्वताची काळजी घेताना आढळून येतात. त्यांचा हा आदर्श इतरांनी घेण्यासारखाच आहे.









