प्रतिनिधी / बेळगाव
तिसरे रेल्वेगेट येथे ओव्हरब्रिज बांधण्याचे काम सुरू आहे. यामुळे रस्त्याच्या एकाच बाजूने वाहतूक सुरू असून वारंवार वाहतुकीची कोंडी होत आहे. बुधवारी या मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. यामुळे उद्यमबागमार्गे शहरात जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. तिन्ही मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे वाहनचालकांमधून संताप व्यक्त केला जात होता.
काँगेस रोड, आरपीडी रोड, तसेच उद्यमबागमधून आलेला रोड तिसरे रेल्वेगेट येथे मिळतो. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. खानापूरमार्गे आलेली वाहतूक याच मार्गे शहरात जाते. परंतु तिसरे रेल्वेगेट येथे ओव्हरब्रिजचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. मोठी वाहने जाण्यास तितकीशी जागा उपलब्ध नसल्याने कोंडीत वाढ होत आहे. बुधवारी अनेक लग्न समारंभ असल्याने ते वेळेत गाठण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू होती. परंतु या वाहतूक कोंडीमुळे त्यांना वेळेत पोहोचणे शक्मय झाले नाही. यामुळे लग्नाचा मुहूर्त त्यांना चुकला. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात होता. वाहतूक कोंडी होणार नाही याचे नियोजन प्रशासनाने करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
पोलिसांची नेमणूक करण्याची गरज
तिसरे रेल्वेगेट येथे नेहमी वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. परंतु बुधवारी या ठिकाणी वाहतूक पोलीस नसल्यामुळे मोठय़ा प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत होती. त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरुपी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी वाहनचालक करीत आहेत.









