ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून, अनेक भागात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, कोरोना अजून संपलेला नाही. तो रुप बदलत आहे. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढाईत नव्याने रुपरेषा आखण्याची गरज आहे. येत्या 6 ते 8 महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार असून, ती टाळता येणे अशक्य आहे, असे ‘एम्स’चे प्रमुख रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे.
गुरेरिया म्हणाले, देशातील अनेक भागात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, लोकांकडून कोरोना नियमांचे पालन होत नाही. बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे. पहिल्या लाटेनंतरही अशाच प्रकारे कोरोना नियमांना तिलांजली देण्यात आली. त्यामुळे दुसरी लाट आली. आता दुसरी लाट ओसरत असताना पुन्हा हिच परिस्थिती दिसून येते. तिसरी लाट थोपवण्यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. आतापर्यंत देशातील 5 टक्के नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. हा लसीकरणाचा वेगही वाढवणे आवश्यक आहे, असेही गुलेरिया यांनी सांगितले आहे.









