खेड पोलिसांची धडक कारवाई, तिघांवर गुन्हा
प्रतिनिधी / खेड
तालुक्यातील तिसंगी-खोपकरवाडी येथील जंगलमय भागात बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या गावठी हातभट्टीच्या दारूधंद्यावर पोलिसांनी बुधवारी सकाळी 7 च्या सुमारास धाड टाकून 3 लाख 30 हजार 350 रूपयांचा ऐवज हस्तगत केला. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजित भोसले, रोशन भोसले, स्वप्निल भोसले (सर्व रा. तिसंगी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तिसंगी-खोपकरवाडी नजीक जंगलमय भागात हे तिघेजण गावठी दारूची हातभट्टी चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे, सहाय्यक पोलीस फौजदार बुरटे, पोलीस शिपाई अजय कडू, राहुल कोरे, प्रकाश पवार, रोहित मांगले, अरविंद जमदाडे, राम नागुलवर, संभाजी मोरपडवार, किरण चव्हाण, सचिन जाधव, रूपेश पेंढामकर यांनी धाड टाकली होती. या धाडीत बेकायदेशीर गावठी दारू बनवण्याची हातभट्टी उद्धवस्त करत दारू निर्मितीचे 10 हजार 500 लिटर रसायन जप्त केले. हे रसायन नाशवंत असल्याने व जंगलातून बाहेर काढून वाहतूक करणे शक्य नसल्याने रसायनाची तेथेच विल्हेवाट लावण्यात आली. या साहित्यासह 385 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू असा पोलिसांकडून 3 लाख 30 हजार 350 रूपयांचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी संशयितावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65 (ब) (क) (फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे करत आहेत. कोरोनाच्या संकटापूर्वी पोलिसांनी कुळवंडी व तिसंगी येथे गावठी हातभट्टीच्या दारू धंद्यावर धाड टाकून लाखो रूपयांचा ऐवज जप्त केला होता.









