तिघा भावांनी मिळून केला विल्सेंट पिरेरा याचा खून : खानापूर पोलिसांनी केला खुनाचा उलघडा : आरोपी गजाआड
प्रतिनिधी / खानापूर
खानापूर तालुक्यातील तिवोलीवाडा येथे गेल्या दि. 3 जानेवारी रोजी झालेल्या विल्सेंट बस्त्यॉव पिरेरा (वय 28) खून प्रकरणाचा तपास लावण्यात अखेर खानापूरचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे, पोलीस उपनिरीक्षक बसगौडा पाटील आणि त्यांच्या सहकारी पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंधाच्या संशयावरून तीन भावांनी मिळून विल्सेंट याचा खून केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले असून त्या तिघाही भावांना अटक करून त्यांच्यावर 302 व 201 कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेची हकीकत अशी की, गेल्या दि. 3 जानेवारी रोजी विल्सेंट पिरेरा हा घरातून बाहेर पडला. आणि तो घरी परतलाच नाही. यामुळे त्याचा शोध सुरू असतानाच दि. 4 रोजी त्याचा मृतदेह जळालेल्या गवत गंजीमध्ये अर्धवट जळक्या अवस्थेत सापडला होता. यामुळे त्याचा घातपात झाल्याचा संशय निर्माण झाला. या प्रकरणी विल्सेंट याच्या घरच्या लोकांनी त्याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करून खानापूर पोलीस स्थानकात या प्रकरणी फिर्याद दाखल केली. यानंतर पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे व उपनिरीक्षक बसगौडा पाटील आणि त्यांच्या सहकाऱयांनी या प्रकरणाच्या तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
या चौकशीत विल्सेंट पिरेरा याचा अनैतिक संबंधातून खून झाल्याचे उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी वलिप कैतान पिरेरा (वय 36), अलेक्स कैतान पिरेरा (वय 33) व मायकल कैतान पिरेरा (वय 29) यांना ताब्यात घेऊन अधिक तपास केला असता त्या तीन भावांनी मिळूनच विल्सेंट पिरेरा याच्या खुनाची कबुली दिली. यामध्ये मिळालेल्या माहितीवरून दि. 3 रोजी पार्टी करण्यासाठी जाऊया, असे सांगून वलिप पिरेरा व त्याच्या इतर दोघा भावांनी त्याला घरातून बोलावून नेले.
गावाजवळील एका शेतवडीत पार्टीदेखील केली. व रात्री 8 च्या सुमारास वलिप यांनी तू माझ्या पत्नीशी अनैतिक संबंध कशासाठी ठेवलेस, असा जाब विचारला. त्यावर विल्सेंट याने तू मला काय विचारतोस, तुझ्या पत्नीलाच जाऊन विचार, असे म्हटले. त्यावर वलिप याने त्या ठिकाणी असलेल्या झोपडीतील फावडय़ाने त्याच्या डोकीत वार केला. त्यापाठोपाठ त्याचा भाऊ अलेक्स याने लोखंडी सळीने तर मायकल पिरेरा याने लाकडाने त्याच्या डोकीत वार केला. यामुळे तो खाली कोसळला. पण त्याचा श्वासोच्छ्श्वास सुरूच होता. तेंव्हा अलेक्स याने त्याचा गळा दाबला. यामुळे तो ठार झाला. यानंतर त्याचा मृतदेह जवळच असलेल्या गवताच्या गंजीत घालून जाळण्याचा प्रयत्न केला. गवतगंजी जळली, पण त्याचा मृतदेह अर्धवट अवस्थेत जळाल्याने त्याची ओळख पटली.









