वार्ताहर / माशेल
तिवरे येथे शेतकरी वर्गाकडून वायंगण शेतीच्या कापणी व मळणीच्या कामाला प्रारंभ करण्यात आला आहे. भातशेताची कापणी व मळणी यंदा मशिनरीद्वारे करण्यात आल्याने शेतकऱयांचे श्रम व वेळ वाचली आहे.
तिवरे भागातील शेतकरी यापूर्वी शेतीच्या लागवडीपासून कापणी व मळणीपर्यंत सर्व कामे मजूर घालून स्वतः करीत. त्यात वेळे व पैसाही जादा खर्च व्हायचा. वाढत्या खर्चामुळे बऱयाच शेतकऱयांनी शेती करणे बंद केले आहे, असे शेतकरी नारायण गावकर यांनी सांगितले. काही अवघेच शेतकरी स्वतः कष्ट करून पिक घेतात. स्थानिक आमदार तथा मंत्री गोविंद गावडे यांनी पडिक शेती पुन्हा लागवडीखाली आणण्यासाठी शेतकऱयांना प्रोत्साहन दिले. त्याचप्रमाणे शेतासाठी लागणारी यंत्रेही उपलब्ध करुन दिल्याने शेतकऱयांचे श्रम, वेळ व अतिरिक्त खर्च वाचला आहे.
आता शेतकरी मशिनरीद्वारे शेत जमीन कसतात. तसेच कापणी व मळणीची कामेही या यंत्राद्वारेच केली जातात. शेतकऱयांना त्यासाठी कृषी खात्यातर्फे सवलत मिळत असल्याने शेतीचे काम जरा सोपे झाले आहे. काही शेतकरी वर्षातून दोनवेळा पिक घेतात मंत्री गोविंद गावडे यांच्या सहकार्याबद्दल शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गोकुळदास नाईक यांनी आभार मानले आहेत.









