धरण दुर्घटनेनंतर तब्बल 15 महिन्यांनी मुहूर्त
प्रतिनिधी / चिपळूण
तालुक्यातील तिवरे धरण दुर्घटनेनंतर तब्बल 15 महिन्यांनी बाधितांच्या पुनर्वसन वसाहत कामास अखेर मुहूर्त मिळाला आहे. मुंबईतील सिध्दीविनायक ट्रस्टने मंजूर केलेल्या एकूण 11 कोटी रूपयांच्या निधीतून प्रथम 24 घरे बांधण्यात येत आहेत. यासाठी काढण्यात आलेल्या घर बांधणीच्या दोन्ही निविदांची कंत्राटे राष्ट्रवादीच्याच दोन नेत्यांच्या कंपनीला मिळाली आहेत. सद्यस्थितीत अलोरे येथे बांधकाम विभागाच्या मार्गदर्शनाखाली जागा साफसफाईस सुरूवात करण्यात आली आहे.
गतवर्षी 2 जुलैला रात्री तिवरे धरण फुटल्यानंतर उडालेल्या हाहाकारात अपरिमित आर्थिक व जीवितहानी झाली. तब्बल 22 जणांचे बळी आणि 45 कुटुंबांच्या संसाराची राखरांगोळी झाली. दुर्घटनेनंतर दौऱयावर आलेल्या मंत्री, नेतेमंडळींनी मोठमोठी आश्वासने दिली. मात्र धरण फुटीला 15 महिन्यांचा कालावधी लोटूनही पुनर्वसन, रस्ते, पूल, साकवांसह धरण पुर्नबांधणी यावर फारशी कार्यवाही झालेली नाही. यामध्ये मुख्यत: बाधितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रारंभीपासून कळीचा ठरला. मात्र उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून सिध्दिविनायक ट्रस्टने आपला निधी दिल्याने तो प्रश्न कायमचा सुटला. त्यातूनच गेल्या आॅगस्ट महिन्यात पुनर्वसन वसाहत कामाचे भूमिपूजन करण्यात आल्यानंतर गेल्या 2 दिवसांपासून प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यात आली आहे. प्रथमत: एक माॅडेल घर तयार करण्यात येणार आहे. त्या घराच्या तपासणीनंतर उर्वरित घरांच्या कामांना सुरूवात केली जाणार असल्याचे बांधकाम विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
अलोरे येथे कोयना प्रकल्पाची वसाहत पडून असल्याने तेथे 1.60 हेक्टर जागेवर पुनर्वसन करण्यात येत आहे. पाणी, वीज, बाजारपेठ, शाळांसह सर्व सोयीसुविधांयुक्त ही जागा महत्वाची ठरणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने सुमारे 3 कोटी 80 लाख रूपये खर्चाच्या 24 घरांसाठीच्या 2 निविदा काढल्या होत्या. या दोन्ही निविदांची कंत्राटे राष्ट्रवादीच्या नेत्यांना मिळाली आहेत. तूर्तास 24 घरांचा प्रश्न सुटला आहे. एकूण 40 कुटुंबाचे पुनर्वसन होणार असल्याने व त्यातच काहीजणांना गावातच रहायचे असल्याने त्यांच्या जागेचा शोध सुरू आहे.
कंटेनर केबिनमध्ये संसार..
धरण दुर्घटनेनंतर बाधितांसाठी गावातच तत्काळ तात्पुरते पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र तेथील जागाही खचल्याने तात्पुरत्या उभारण्यात येणाऱ्या शेडचा पर्याय सोडून कंटेनर केबिनचा पर्याय निवडण्यात आला. सुमारे 60 लाख खर्चातून 300 स्क्वेअर फुटाचे 15 कंटेनर आणून बाधितांचे तेथे पुनर्वसन करण्यात आले. हाॅल, रूम, किचन व बाथरूमची व्यवस्था असलेल्या या कंटेनर केबिनमध्ये दुर्घटनेनंतर बाधितांचा संसार सुरू आहे. मात्र आता पुनर्वसन कामास सुरूवात झाल्याने वर्षभरात का होईना हक्काचे घर मिळेल, या आनंदात बाधित आहेत.
काम सुरू झाल्याचा आनंद पण…
उशिरा का होईना, पण आमच्या पुनर्वसन वसाहतीचे काम सुरू झाले आहे, त्याचा आनंद आहे. मात्र दुर्घटनेनंतर गेल्या 15 महिन्यातील आलेले अनुभव लक्षात घेता काम उशिराने सुरू झालेले असले तरी यापुढील काळात त्याला गती मिळावी आणि बाधितांना घरकुले मिळावीत, अशी अपेक्षा आहे.
-अजित चव्हाण, राजेंद्र गायकवाड
तिवरे समन्वय समिती सदस्य
Previous Articleशिवाजी विद्यापीठाच्या परीक्षांनाही पावसाचा फटका
Next Article पुराच्या पाण्यात दुचाकी घालणे पडले महागात









