विश्रामगृहावर केली अलगीकरण व्यवस्था : इमारतीची दोन्ही बाजूंनी पडझड : भिंतीला लावले प्लास्टिक
प्रतिनिधी / साटेली-भेडशी:
कोरोना पार्श्वभूमीवर आता शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे सध्या चाकरमानी गावी दाखल होत असून या सर्वांची सुरक्षेच्यादृष्टीने संस्थात्मक अलगीकरण करण्यासाठी गावातील शाळा, शासकीय इमारती, वसतिगृह, विश्रामगृह ताब्यात घेऊन याठिकाणी या दाखल होणाऱयाची सोय केली जाणार आहे. या अलगीकरण करण्यात येणाऱया इमारती व तेथील सोयीसुविधा मोठी समस्या आहे. यावरून गावपातळीवर प्रशासन, नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्यात मतभेद व्हायला सुरुवात झाली आहे.
दोडामार्ग तालुक्यातील संस्थात्मक अलगीकरण करण्यासाठी प्रशासनाने इमारती ताब्यात घेतल्या आहेत. तिलारी विश्रामगृह ताब्यात घेण्याची हालचाली सुरू झाल्या असून या इमारतीची सद्यस्थिती पाहता सुरक्षेच्यादृष्टीने खूपच बिकट अवस्था आहे. येथे असलेल्या सध्याच्या कर्मचाऱयांनी घेतलेल्या परिश्रमामुळे विश्रामगृह समोरील बगीचा व झाडे सोडता मुख्य इमारत शेवटची घटका मोजत असल्याची स्थिती असून दोन बाजूंनी इमारतीची पडझड झाली आहे. भिंतीना प्लास्टिक लावलेले आहे तर अंतर्गत स्थिती लक्षात घेता आतील छत केव्हाही पडू शकते, अशीच स्थिती आहे. शौचालय, बाथरुम याचीही मोठी दुरवस्था झालेली आहे. अशी परिस्थिती असताना अधिकाऱयांनी नेमका काय अहवाल दिला?, हा कक्ष ताब्यात घेणाऱया अधिकाऱयांनी याची काय पाहणी केली? असा प्रश्न निर्माण होत आहे.
शाळांमध्ये सुविधांची वानवा
साटेली भेडशी ग्रामपंचायत हद्दीतील ताब्यात घेण्यात आलेल्या या शाळामध्ये ही आवश्यक सुविधांची वानवा आहे. या शाळा वस्तीलगत, मुख्य बाजारपेठ क्षेत्रात येतात. याचा विचार करता सुरक्षेच्यादृष्टीने जोखमीच्या आहेत. यामुळे नागरिकांमधून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहे.
वस्तीलगत अलगीकरण कक्ष नको – लोंढे
तिलारी विश्रामगृह हे वस्तीलगत येत असून या इमारतीच्या आजुबाजूला मोठी वसाहतीत खोल्यामध्ये नागरिक राहतात तर तिलारी विश्रामगृहाची इमारतीची मोठी पडझड झाली असून सुरक्षेच्यादृष्टीने जोखमीचे आहे. आवश्यक सुविधांचीही मोठी वानवा आहे. यामुळे या कक्षासाठी अन्य इमारतीचा वापर व्हावा, अशी प्रतिक्रिया कोनाळ ग्रामपंचायत सदस्य महेश लोंढे यांन व्यक्त केली आहे.
असुरक्षित इमारत अलगीकरणासाठी नको – लखू खरवत
साटेली भेडशी तालुक्यातील मोठय़ा बाजारपेठेचे केंद्र असून सद्या अलगीकरण कक्षासाठी ताब्यात घेतलेल्या शाळा व अन्य इमारती या बाजारपेठ व वस्तीलगत येत आहेत. त्यामुळे अनेक अडचणी येऊ शकतात. या टाळण्यासाठी आणि येथील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रशासनाने अलगीकरण कक्ष स्थापन करताना आवश्यक मूलभूत सुविधांची पूर्तता शासनाने करावी, अशी मागणी साटेली-भेडशी सरपंच लखू खरवत यांनी केली आहे.
तिलारीत जबाबदार अधिकाऱयांची पाठ
तिलारी धरण प्रकल्प कार्यालयात जबाबदार अधिकाऱयांनी दुर्लक्ष केल्याने प्रकल्पाची मोठी वाताहत होत आहे. या वाताहातीला हे अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. सध्या प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता अलगीकरण कक्षात आहेत तर सहाय्यक अभियंता मुदगल हे सहा महिन्यापासून तिलारी कार्यालयातच आले नाही, अशी चर्चा आहे.









