दोडामार्ग / वार्ताहर-
तिलारी नदीपात्रात साचलेला गाळ काढणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र हा गाळ काढण्यास यांत्रिकी विभाग वेळकाढूपणा करत आहे. परिणामी पावसाळ्यात नदीला पूर आल्यास हे पाणी लगत असणाऱ्या गावात शिरून धोका निर्माण होतो. यंदादेखील अशीच परिस्थिती निर्माण झाल्यास यास पूर्णतः प्रशासन जबाबदार राहील असे शिवसेना जिल्हा उपसंघटक गोपाळ गवस यांनी सांगितले. तसेच या आशयाचे एक निवेदन जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना देणार असल्याचेही श्री. गवस यांनी स्पष्ट केले.
यावेळी गोपाळ गवस पुढे म्हणाले की, दोडामार्ग तालुक्यातील तिलारी नदीला गेल्या दोन वर्षापासून पावसात मोठ्या प्रमाणात पाणी येते व आजूबाजूच्या गावांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात हानी होते. मुळातच या नदीवर तिलारी धरणाचे पाणी सोडले जाते, तसेच पावसाचे पाणी, नदी, नाले यांचे पाणी तसेच चंदगड येथील धामणे धरणाचे पाणी सोडले जाते. त्यामुळे पावसामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात आल्याने गावात तसेच वस्ती व घरांमध्ये पाणी शिरते, असे असतानाही प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेते. तिलारी नदीचा गाळ काढणे करिता यांत्रिक विभाग अलोरा, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, तिलारी पाटबंधारे प्रकल्प यांची जबाबदारी होती. या भागातील लोकांना प्रशासनाने या गाळ काढण्याच्या कामात चालढकल केल्यामुळे हा त्रास होणार आहे. तसेच याबाबतचे निवेदनही जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन लवकरच सादर करणार असल्याचेही गवस यांनी सांगितले.









