अधिकाऱयांकडूनच मिळाली धक्कादायक माहिती : कालमर्यादा संपल्याचा वरिष्ठ कार्यालयाला अहवालही : दोन्ही प्रमुख कालव्यांची सुरक्षितता ऐरणीवर
तेजस देसाई / दोडामार्ग:
महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांचा मिळून साकारलेल्या ‘तिलारी आंतरराज्य पाटबंधारे’ प्रकल्पांतर्गतच्या तिलारी धरणाच्या सुरक्षिततेसोबत आता या धरणाशी निगडीत डावा व उजवा या दोन प्रमुख कालव्यांच्याही सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला आहे. गोव्याच्या दिशेने पाणी वाहून नेणाऱया दोन्ही कालव्यांची कालमर्यादा (व्हॅलिडिटी) केव्हाच संपली आहे, अशी धक्कादायक माहिती या प्रकल्पाशी निगडीत एका जबाबदार अधिकाऱयाने प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलताना दिली.
एवढेच नव्हे तर मंत्रालयीन स्तरावर वरिष्ठ पातळीवरील याच महिन्यातील एका बैठकीत कालव्यांची कालमर्यादा संपल्याबाबतचा सविस्तर अहवाल देण्यात आल्याचेही या पदाधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे. ते पाहता रत्नागिरी जिल्हय़ातील तिवरे धरण फुटण्याला खेकडे जबाबदार आहेत, असे सांगणाऱया प्रशासनाकडे तिलारी कालवे व धरणाच्या अनुषंगाने कालव्यांची ‘व्हॅलिडिटी’ संपल्याचे कारण असेल काय? असा सवाल ग्रामस्थ, शेतकरी यांनी विचारला आहे.
तिलारी पाटबंधारे प्रकल्पांतर्गत दोन प्रमुख उजवा व डावा असे कालवे काढण्यात आले आहेत. त्यापैकी डावा कालवा हा महाराष्ट्र हद्दीत अर्थात दोडामार्ग तालुक्यात 33 कि. मी. चा असून गोव्याकडे तो 48.80 कि. मी. चा आहे तर उजवा कालवा महाराष्ट्रामध्ये 18 व 28 कि. मी. अशा दोन स्तरावर असून गोव्यामध्ये 40.80 कि. मी. आहे. या दोन्ही कालव्यांमध्ये महाराष्ट्रातील या धरणाचे पाणी ठरलेल्या वाटपानुसार गोव्यात सोडले जाते. अलिकडच्या काळात मुख्य धरणाची सुरक्षितता या प्रश्नावर बराच ऊहापोह होत असे. त्यात आता हे मुख्य कालवे फुटण्याच्या घटनांनी भर टाकली आहे. आंबेलीतील माणगावकरवाडी येथे दोन दिवसांपूर्वी डावा कालवा फुटण्याच्या घटनांनी भर टाकली आहे. आंबेलीतील माणगावकरवाडी येथे दोन दिवसांपूर्वी डावा कालवा फुटला आणि कालवा फुटीची तिसरी मोठी घटना घडली.
कालव्यांची कालमर्यादा संपली?
वरील दोन कालव्यांमधून जे पाणी सोडले जाते, त्या पाण्याचा दोडामार्ग तालुक्यातील व गोव्यातील डिचोली तसेच पेडणे या दोन तालुक्यातील शेतकऱयांना लाभ होतो. अनेकांची शेती, बागायती या पाण्यावर अवलंबून आहे. काल-परवा घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बोलताना प्रकल्प प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱयाने या कालव्यांच्या कालमर्यादेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे भविष्यात धरणाच्या सुरक्षिततेसोबत आता कधीही फुटू शकणाऱया कालव्यांचाही प्रश्न समोर आला आहे. या दोन्ही कालव्यांची ‘कालमर्यादा’ संपुष्टात आली असून यासंदर्भात आपण या महिन्यात मंत्रालय पातळीवरील वरिष्ठ स्तरावरच्या एका बैठकीत सविस्तर माहिती दिली आहे, असे स्पष्ट केले. कालव्यांच्या कालमर्यादेवरूनच गौप्यस्फोट झाल्याने या दोन्ही कालव्यांच्या आजूबाजूला असणारी लोकवस्ती, शेतीबागायती यांच्यावर नजीकच्या काळात मोठे धोके उभे राहण्याचे संकट उभे राहिले आहे.
नुकसान नाही म्हणून गांभीर्याने घ्यायचे नाही का?
आंबेली-माणगावकरवाडी येथे काल-परवा जेव्हा कालवा फुटला. त्यात लगतच्या एका शेतकऱयाच्या शेतीभातीचे नुकसान झाले. परंतु, केवळ एका शेतकऱयाच्या नुकसानीची दखल घेण्याइतपत तसेच कालव्यांवरून प्रश्नचिन्ह उभे करण्याइतपत ही घटना आहे काय? असा संतापजनक सवाल काही अधिकारी वर्गात बोलला जात असल्याची चर्चा आहे. केवळ एका शेतकऱयाचे जरी नुकसान झाले, तरी वाहून गेलेल्या कालव्यांमुळे जे नुकसान झाले तेदेखील सर्वसामान्य जनतेच्या पैशांतूनच झाले आहे. हे धरण कालवे कोणा अधिकाऱयांच्या पैशातून नव्हे, तर सर्वसामान्यांच्या कष्टाच्या पैशातून बांधण्यात आले आहे व त्याची जाण वरील स्वरुपात चर्चा करणाऱया अधिकाऱयांनी ठेवावी, अशी प्रतिक्रिया तिलारी खोऱयात उमटत आहे.
40 वर्षांत कालव्यांची निगा कितपत ठेवली?
या दोन्ही कालव्यांच्या ‘व्हॅलिडिटी’वरून बोलताना त्या अधिकाऱयाने स्पष्ट केले की, साधारणत: 40 वर्षांपूर्वी जेव्हा हे धरण व कालवे बांधण्यात येत होते, तेव्हा त्यावेळी तत्कालीन यंत्रसामग्रीच्या सहाय्याने त्यावेळची कामे झाली आहेत. त्यामुळेच झालेल्या कामांच्या कालमर्यादा संपत आहेत. ते पाहता गेल्या 40 वर्षांतील कालव्याची दुरुस्ती, साफसफाई व निगा राखण्यासाठी या धरण प्रकल्पांतर्गतच्या कालवा विभागाच्या अधिकाऱयांनी नेमकी आतापर्यंत काय कार्यवाही केली? असा प्रश्न उपस्थित होतो. गेल्या 40 वर्षांत अनेक अधिकारी आले व गेले. अनेकांच्या कालावधीत या कालव्यांच्या दुरुस्तीची तसेच साफसफाईची कामे झाली असतील, असे गृहीत धरले तर आजही अनेक कालवे हे थेट झाडाझुडपांनी वेढलेले पाहायला मिळतात. त्याला जबाबदार कोण? दोडामार्ग-तिलारी मार्गातील कालव्यांचा भाग असो किंवा दोडामार्ग शहरातील साईमंदिरच्या मागून गोवा दिशेने गेलेला कालवा असो. दोन्ही बाजूने ढेपाळलेले कालवे हे कुठच्या कार्यक्षमतेचे प्रतिक आहेत, हाही प्रश्न उपस्थित होतो.









