‘तिळगुळ घ्या नि गोड गोड बोला!’ असे म्हणत कोणी हातावर नुसता तिळगूळ, तिळाचे लाडू?, वडय़ा असे काहीही ठेवले तरी समोरच्या व्यक्तीच्या चेहऱयावर लगेच हसू उमटते. मोठय़ांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेतला जातो. दोन्ही व्यक्तींच्या चेहऱयावर नकळत प्रसन्नता फुलते. भारतीय सण-उत्सवांचे हेच तर महत्त्व आहे. दोन माणसांमधली विचारांची, संबंधांची दरी मिटवली जाते अशा प्रसंगांनी. समाजात एकोपा, सामंजस्य वाढवण्याचे काम आपले सण नेहमीच करीत असतात. आता जानेवारी हा आंग्लवर्षाचा पहिला महिना. आपले हिंदू सण नेहमी आपल्या चांद्रमासाप्रमाणे येतात. परंतु मकरसंक्रांत हा सण मात्र सौरकालगणनेशी संबंधित आहे. हिंदू पंचांगानुसार तो पौष महिन्यात, तर इंग्रजी महिन्यात सर्वसामान्यपणे 14 जानेवारीला तो साजरा होतो. क्वचित ही तारीख एखादा दिवस मागेपुढे होते. हा सण कृषीसंस्कृतीशी निगडित आहे. या दिवसात शेतातील धान्ये, पिके तयार होऊन घरात आलेली असतात. म्हणून सुगडात ऊस, बोरे, तीळ, हरभरे, गव्हाच्या लोंबी इ. भरून त्यांची पूजा केली जाते, ते देवाला अर्पण केले जाते. म्हणजे ज्याने आपल्याला ते दिले, त्यांच्याविषयी एक प्रकारे कृतज्ञता व्यक्त केली जाते. स्त्रिया या दिवसात हळदीकुंकू समारंभ करून त्यात विविध प्रकारच्या वस्तुंचे वाण, तिळगूळ एकमेकींना देतात. त्यानिमित्ताने त्या एकत्र येतात. गप्पागोष्टी होतात. स्नेहभाव अधिक दृढ होतो. तीळ हे स्नेहाचे प्रतीक, तर गूळ हे गोडव्याचे!या दिवसात खरे म्हणजे थंडी असते, त्यामुळे तिळगुळासारखे व इतर पदार्थ शरीरात उष्णता निर्माण करतात. शिवाय ते पौष्टिक असतात. ही झाली माणसाची उत्सवप्रियता. पण यामागे एक भौगोलिक कारणही दडलेले आहे. जानेवारीत सूर्याचे उत्तरायण सुरू होते. तो मकर राशीत प्रवेश करतो. खरेतर 21-22 डिसेंबर पासूनच सूर्य उगवण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकत असते. संक्रांतीला सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. एकंदरीत सूर्याचे संक्रमण आणि पृथ्वीच्या फिरण्याच्या गतीशी हा सण निगडित आहे. हा सण तीन दिवस साजरा करतात. संक्रांतीचा आदला दिवस ‘भोगी’, मग संक्रांत आणि दुसऱया दिवशी ‘किंक्रांत’ अशी त्यांची नावे आहेत. भोगीला मुगाची खिचडी, बाजरीची भाकरी इ. पदार्थ केले जातात. संक्रांतीला गुळाच्या पोळय़ा करतात. किंक्रांतीला ‘करीदिन’ असे म्हणतात. अशा या गोड सणाला ‘तिळगुळ घ्या नि गोड गोड बोला’ असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना देऊया.
तिलगुड प्रदानेन सर्वे तुष्यन्ति मानवाः।
तस्मात् तदेव कर्तव्यं स्नेहवृद्धिः भविष्यति।








