पुरातत्वशास्त्रज्ञांना मोठे यश, 8,500 वर्षांचा इतिहास
संयुक्त अरब अमिरातीतील पुरातत्वशास्त्रज्ञांनी देशातील सर्वात जुनी वास्तू शोधून काढली आहे. ही वास्तू 8,500 वर्षे जुनी असल्याचे पुरातत्वशास्त्रज्ञांनी सांगितले. अबू धाबी बेटावरील काही प्रसिद्ध थडग्यांपैकी हे एक आहे. ही इमारत पूर्वी सापडलेल्या इमारतीपेक्षा 500 वर्षे जुनी आहे. अबुधाबीच्या संस्कृती आणि पर्यटन विभागाने या अद्भुत शोधाची माहिती दिली आहे. अबुधाबी शहराच्या पश्चिमेला असलेल्या घघा बेटावर ही सर्वात जुनी इमारत सापडली आहे. या बेटावरून सापडलेली रचना ‘साध्या गोल खोल्यां’सारखी असून त्याभोवती दगडी भिंत आहे. ही भिंत 3.3 फूट उंच आहे आणि अजूनही सुरक्षित आहे. ही रचना त्यावेळी बेटावर राहणाऱया लोकांच्या समुदायाचे घर असावे, असा कयास संशोधकांच्या टीमने व्यक्त केला आहे. येथे राहणाऱया लोकांनी समुद्रात सापडलेल्या नैसर्गिक संसाधनांचा वापर केला असण्याची शक्मयता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच दीर्घ-अंतराचा सागरी व्यापार मार्ग सुरू होण्यापूर्वीही निओलिथिक वसाहती अस्तित्वात असल्याचे या शोधावरून दिसून येते.

घटनास्थळी हजारो पुरातन वास्तूही सापडल्या आहेत. यामध्ये दगडापासून बनवलेल्या बाणांचा समावेश आहे. याचा वापर शिकार करण्यासाठी केला जात असे. तथापि, पुरातत्वशास्त्रज्ञांना अद्याप हे घर कधी वापरण्यात आले याची खात्री नाही. सुमारे 5 हजार वर्षे जुन्या या इमारतीजवळ एक मृतदेह पुरलेला आढळून आला आहे. यापूर्वी अबू धाबीच्या किनारपट्टीवर असलेल्या मारवाह बेटावर युएईमधील सर्वात जुनी इमारत सापडली होती. तसेच याठिकाणी 2017 मध्ये जगातील सर्वात जुना मोती सापडला होता.









