चेन्नई / वृत्तसंस्था :
दक्षिण भारतातील बहुतांश मंदिरांची उभारणी प्राचीनकाळात झालेली आहे. यात तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली जिल्हय़ाच्या तिरुवनैकवल येथील जंबुकेश्वर अखिलंदेश्वरी मंदिरही सामील आहे. या मंदिराची उभारणी चोल वंशीय राजा कोचेन्गनन याने केली होती. या शिव मंदिर परिसरात सुरू असलेल्या उत्खननाच्या दरम्यान 504 सुवर्णनाण्यांनी भरलेला कलश सापडला आहे. मंदिर प्रशासनाने ही नाणी पोलिसांना सुपूर्द केली आहेत.
कलशात मिळालेल्या सुवर्णनाण्यांचे वजन 1.716 किलो आहे. ही नाणी 10-12 व्या शतकातील असू शकतात. नाण्यांवर अरबी लिपीतील अक्षरे असल्याची माहिती मंदिर व्यवस्थापनाने दिली आहे.

शिलालेखात माहिती
मंदिर प्रशासनानुसार या मंदिराची उभारणी सुमारे 1800 वर्षांपूर्वी चोल राजवटीत झाला होता. मंदिराशी संबंधित 156 शिलालेख सापडले होते आणि त्यात चोल राजघराण्यातील राजा परांतक प्रथमच्या काळातील शिलालेख सर्वात जुना असून तो नवव्या शतकातील आहे. या शिलालेखात मंदिराचा जिर्णोद्धार आणि धनाविषयी तपशील नमूद आहे. चोल राजघराण्यानंतरही वेळोवेळी या मंदिराची देखरेख आणि दुरुस्ती करण्यात आली आहे.
जुन्याकाळी जांभळाचे वन
तिरुवनैकलमध्ये सद्यकाळात मंदिर असलेल्या ठिकाणी प्राचीनकाळी जांभळाचे वन होते. मंदिराच्या मागील बाजूस जुनाट बांधकाम असून त्यावर जांभळाचा प्राचीन वृक्ष आहे. मंदिराला प्राप्त शिलालेखानुसार प्राचीनकाळात जांभळाच्या वृक्षाखालील भगवान शिवने दोन भक्तांना दर्शन दिले होते. त्या काळापासूनच तेथे शिवलिंग असल्याने या मंदिराला नाव जंबुकेश्वर असे पडले आहे. जंबू या शब्दाचा मराठीत अर्थ जांभूळ असा होतो.
जंबुकेश्वर अखिलंदेश्वरी मंदिर
तिरुवनैकवल येथील जंबुकेश्वर अखिलंदेश्वरी मंदिर भगवान शिवपार्वतीचे प्रमुख मंदिर आहे. या शिवलिंगाला पंचतत्व लिंगांपैकी एक जलतत्व लिंग म्हणून ओळखले जाते. सुमारे 100 गुंठे क्षेत्रात फैलावलेल्या या मंदिरात तीन प्रागंणे आहेत. मंदिर प्रवेशस्थळी असलेल्या प्रागंणात सुमरे 400 स्तंभ उभे आहेत. तर डाव्या बाजूला एक सरोवर असून त्याच्या मधोमध्य मंडप निर्माण करण्यात आला आहे. आदि शंकराचार्य यांनी येथील जंबुकेश्वर लिंग मूर्तीची पूजा केली होती. मंदिरात शंकराचार्य यांचीही मूर्ती आहे.

- जंबुकेश्वर मंदिराच्या तिसऱया प्रदक्षिणा क्षेत्रात सुब्रह्मण्यम मंदिर असून तेथे भगवान शिवाचे पंचमुखी लिंग आहे.
- जंबुकेश्वर मंदिराच्या पटांगणात देवी पार्वतीचे विशाल मंदिर असून तेथे देवीची पूजा जगंदबेच्या स्वरुपात केली जाते.
- या मंदिरानजीकच भगवान गणेशाचेही मंदिर आहे. या मूर्तीची प्रतिष्ठापना आदि शंकराचार्यांनी केली होती.
- प्राचीन काळात मूर्तीमध्ये अत्याधिक तेज असल्याने कुणालाच दर्शन घेता येत नव्हते असा मंदिर प्रशासनाचा दावा.
- आदिशंकराचार्यांनी मूर्तीच्या कानांमध्ये हिऱयाने जडविलेले श्रीयंत्राचे कुंडल घातल्याने तेज घडल्याचे प्रशासनाचे सांगणे.









