वृत्तसंस्था/ मुंबई
सप्ताहातील अंतिम दिवसात शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. व्यवहारा दरम्यान सेन्सेक्स 300 अंकाच्या वरती जात निर्देशांक 41 हजार 775 वर पोहोचला होता. अशीच कामगिरी निफ्टीकडूनही नोंदवण्यात आली आहे. यामध्ये देशातील दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिस कंपनीचे समभाग तिसऱया तिमाहीचे आकडे सादर होण्याअगोदर तेजीत राहिले आहेत. दिवसभरातील व्यवहारा वेळी इन्फोसिसचे समभाग 2 टक्क्यांनी वाढले होते. बाजारात अंतिम क्षणी 1.47 टक्कयांनी समभाग वधारुन 738.25 रुपये किमतीवर पोहोचला होता.
इराण आणि अमेरिकेत सुरु असलेल्या तणावाच्या वातावरणामुळे युद्धजन्य स्थिती दोन्ही देशात निर्माण झाली होती. परंतु दोन्ही देशातील तणाव निवळण्याची चिन्हे दिसत असल्याने यांचा फायदा बाजारातील घसरण थांबवण्यास झालेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे चीन आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणाऱया करारामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह पहावयास मिळत असून डॉलरच्या तुलनेत रुपयात झालेल्या घसरणीचा फायदाही समभाग वधारण्यास झाला असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.








