आरबीआय अहवालातून माहिती सादर : क्रेडिट वाढीचा दरही कमीच
वृत्तसंस्था/ मुंबई
सप्टेंबर तिमाहीच्या दरम्यान कर्जाचा प्रवास हा काही प्रमाणात संथ झाला असल्याचे पहावयास मिळाले आहे. चालू आर्थिक वर्षामधील (2020-21)दुसऱया तिमाहीत हा टक्का 5.8 टक्क्यांवर राहिला आहे. मागील वर्षातील समान तिमाहीत तो 8.9 टक्क्यांवर होता. दुसऱया बाजुला बँकांच्या ठेवींमध्ये सकारात्मक तेजी राहिल्याची नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत बँक ठेवी सप्टेंबर तिमाहीत 11 टक्क्यांवर राहिल्याची नोंद केली आहे. हा आकडा मात्र मागील वर्षातील समान तिमाहीत 10.1 टक्क्यांवर होता, अशी माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) शेडय़ूल्ड कमर्शिअल बँकांच्या तिमाही ठेवी आणि क्रेडिट स्टॅटिस्टिक्सनुसार दिलेली आहे.
तिमाही दरम्यान क्रेडिट वाढीमधील घसरण ही साधारणपणे सर्व समूहात राहिली आहे. मेट्रोपॉलिटनमध्ये मागील वर्षातील 7.2 टक्क्यांच्या तुलनेत 3.6 टक्क्यांवर घसरण राहिली. तसेच शहरी आणि ग्रामीण लोकसंख्या समूहातही घसरण दिसून आली आहे. वार्षिक पातळीवर सप्टेंबर तिमाहीत खासगी बँकांची पेडिट वाढ ही 6.9 टक्क्यांवर होती. जी एक वर्षापूर्वी 14.4 टक्क्यांच्या घरात राहिली आहे. दुसऱया बाजूला सरकारी क्षेत्रातील बँकांची क्रेडिट वाढ ही हलक्या प्रमाणात वाढली आहे.
बँक ठेवींमध्ये वाढ
सप्टेंबर तिमाहीदरम्यान बँक ठेवींमध्ये वाढ दर्शवण्यात आली आहे. यामध्ये चालू खाते आणि बचत खात्यांचा वाटा वाढलेला आहे. सप्टेंबर तिमाहीत एकूण रक्कम जमा करण्यात आलेल्या खात्यांमध्ये यांची हिस्सेदारी ही 42.3 टक्क्यांवर राहिल्याची नोंद असून मागील वर्षातील समान तिमाहीत हा आकडा मात्र 41.2 टक्क्यांवर स्थिरावल्याची माहिती आहे. क्रेडिट वाढीच्या तुलनेत ठेवीचा दर हा दोन्हीच्या कालावधीत हा सरासरी रेशो घटलेला आहे.









