सप्टेंबर तिमाहीत आर्थिक विकासदर 33.1 टक्क्यांवर : 1947 नंतर गाठला उच्चांक
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
गेल्या सात ते आठ महिन्यांच्या कालावधीपासून जगातील बहुतांश देश कोरोना संकटामुळे काही काळ पूर्ण लॉकडाऊनमध्ये राहिले होते. याचाच नकारात्मक परिणाम जगभरातील आयात-निर्यातीवर मोठय़ा प्रमाणात झाला होता. यामुळे विविध देशांची अर्थव्यवस्था संकटात सापडली होती. परंतु सध्या कोरोना लस आणि अनलॉकच्या प्रक्रियेमुळे उद्योगधंदे तेजी घेत असल्याचे पहावयास मिळत आहे.
याचाच एक भाग म्हणून जगाची महासत्ता अशी ओळख असणाऱया अमेरिकेचा सप्टेंबर तिमाहीतील प्रवास हा मजबूत राहिला आहे. सदर तिमाहीत आर्थिक विकासदर (जीडीपी) उच्चांकी 33.1 टक्क्यांवर राहिल्याची नोंद केली आहे. हा आकडा एक महिन्याअगोदर व्यक्त केलेल्या अंदाजाबरोबर असल्याचे पहावयास मिळाले आहे. परंतु सध्याच्या कोरोनाच्या दुसऱया लाटेच्या प्रभावाने डिसेंबर तिमाहीत जीडीपीत मोठय़ा घसरणीचे संकेत तज्ञांकडून व्यक्त केले जात असून काही अभ्यासक तर पुन्हा एकदा अर्थव्यवस्था मंदीच्या जाळय़ात अडकण्याचा अंदाज बांधत आहेत.
पूर्वी व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजानुसारच जीडीपी दर राहिला आहे. याबाबत अमेरिकन वाणिज्य मंत्रालयाने गुरुवारी सादर केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट केले असल्याचे सांगण्यात येते.
व्यावसायिक गुंतवणूक, हाऊसिंग आणि निर्यात संदर्भातील अंदाज हा तेजीत राहण्याचे संकेत व्यक्त केले आहेत.
पहिल्या सहामाहीतील नुकसान भरपाई
तिमाही दर तिमाहीच्या आधारे विकासदर 33.1 टक्क्यांच्या उच्चांकावर पोहोचला असून 1947 नंतर हा सर्वात मजबूत विकासदर राहिल्याची नोंद आहे. यामध्ये या अगोदर 1950 मध्ये विक्रमी 16.7 टक्क्यांचा विकास दर नोंदवला होता.









