कुळे येथे मार्गदर्शन कार्यक्रमात मंत्री दीपक पाऊसकर यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ धारबांदोडा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश चांगली प्रगती करीत आहे. केंद्र सरकारने जी तीन विधेयके शेतकऱयांसाठी आणली आहेत ती शेतकऱयांचे हित जपण्यासाठी. या विधेयकांना केवळ तीन राज्यांमध्ये विरोध होत असून हा विरोध केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी आहे. सर्वसामान्य जनतेपर्यंत निधी कसा पोचवावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी योजना तयार करीत आहे. गोव्यात या तिन्ही विधेयकांना विरोध नाही, असे प्रतिपादन बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांनी केले.
कुळे येथे राक्षस मळीकेश्वर देवस्थानाच्या सभागृहात आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. किसान सन्मान निधी वितरण कार्यक्रमासंदर्भात आयोजित केलेल्या सभेत ते शेतकऱयांना मार्गदर्शन करीत होते. यावेळी व्यासपीठावर धारबांदोडाच्या जिल्हा पंचायत सदस्य सुधा गांवकर, सावर्डे भाजपा मंडळाध्यक्ष विलास देसाई, उपाध्यक्ष आपा गांवकर, कुळेचे सरपंच मनीष लांबोर, मोलेच्या सरपंच तन्वी केरकर, कुळे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नामदेव म्हार्दोळकर, वाकीकुळण किसान सभेचे अध्यक्ष नरेश शिगांवकर, भाजप किसान मोर्चा सभेचे महासचिव उदय प्रभूदेसाई, धारबांदोडा विभागीय कृषी अधिकारी नागेश कोमरपंत उपस्थित होते.
दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या पंतप्रधानाच्या कार्यकाळात देशाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव मिळवून दिले. या काळात त्यांनी देशाची चांगली प्रगती केली. महामार्ग विस्तारीकरण व सर्वशिक्षा अभियानासारखे उपक्रम त्यांनी हातात घेतले, असे ते पुढे बोलताना म्हणाले.
कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यांच्या तसबिरीला हार अर्पण करण्यात आला. समई प्रज्वलीत करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या प्रसंगी बोलताना कृषी अधिकारी नागेश कोमरपंत म्हणाले की गोव्यात सुमारे 970 शेतकऱयांनी किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेतला आहे. धारबांदोडा तालुक्यात सुमारे तीन हजार शेतकरी आहेत. पैकी 1425 शेतकऱयांकडे किसान कार्ड आहेत तर 416 शेतकऱयांनी किसान सन्मान योजनेचा लाभ घतेला आहे. किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी कृषी कार्ड असणे बंधनकारक नसून ज्या शेतकऱयांच्या नावावर जमीन आहे असे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात, असे सांगून जास्तीत जास्त शेतकऱयांनी कृषी कार्ड करावे. यासाठी कृषी विभागाचा प्रयत्न आहे. धारबांदोडय़ात शेतकरी कृषी व्यवसायाकडे वळावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहे असे ते म्हणाले.
साकोर्डा पंचायतीचे पंचसदस्य शिरीष देसाई यांनी वाजपेयी यांच्या कार्याचा आढावा घेतला. उदय देशप्रभू यांनीही आपले विचार मांडले. सरपंच मनीष लांबोर यांनी स्वागत केले. काशिनाथ नाईक यांनी कृषी खात्याच्या योजना व शेतीसंबंधी संमत केलेली विधेयके यांच्यावर सविस्तर माहिती दिली. पंचसदस्य मच्छिंद्र देसाई यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यानंतर पंप्रधान मोदी यांचा शेतकरी बिलावरील थेट कार्यक्रम पडद्यावर दाखविण्यात आला.









