शाहुवाडी / प्रतिनिधी
आंबा घाटातील विसावा पॉईंटवरून स्विफ्ट गाडी तीनशे फूट दरीत कोसळून झालेल्या अपघातात चालक संजय गणेश जोशी (वय 60 रा. राजारामपूरी 5 वी गल्ली, कोल्हापूर) ठार झाले. सकाळी अकराच्या सुमारास हा अपघात झाला असून याची साखरपा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
अधिक माहिती अशी : आज सकाळी जोशी घाट उतरताना विसावा या प्रेक्षणीय पॉईंटवर मुख्य रस्ता सोडून पन्नास फूट गाडी दरीकडे जावून सुमारे तिनशे फूट दरीत कोसळली. गाडीचालक जोशी गाडीतून बाहेर फेकले गेले जाऊन ओघळात कोसळले. गाडीच्या अलीकडे 40 फुटावर त्यांचा मृतदेह विपन्नावस्थेत पडला होता.
बारा वाजता साखरपा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आंबा व साखरपा येथील मदत पथक झाडाझुडपाच्या आधार घेत दरीत उतरले बारा ते चार अशा चार तासानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. या मदत कार्यात राहुल गायकवाड, राजू काकडे, आंबा येथील दिनेश कांबळे, दिग्वीजय गुरव, सुनील काळे, राहुल बोंडे, अक्षय महाडिक, राजेश गायकवाड यांनी योगदान दिले. विसावा पॉइंटला बांधलेला लोखंडी ग्रिल दोन वर्षापासून दुरावस्थेत आहे. तो मजबूत असता तर दूर्घटना टळली असती. पाच वाजता मृतदेह साखरपा रूग्णालयात शवविच्छेदनास नेला . देवरूखचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव, पी.एस.आय.विद्या पाटील तपास करीत आहेत.









