प्रतिनिधी / कणकवली:
चौके-आंबेरी रोडवर 2013 मध्ये झालेल्या ट्रक अपघातात माडय़ाचीवाडी (ता. कुडाळ) येथील तिघांचा मृत्यू झाला होता. या तीनही व्यक्तींच्या वारसांना मिळून 23 लाख 30 हजार रुपयांची भरपाई देण्याचे आदेश मोटार अपघात न्यायालय, सिंधुदुर्गने दिले आहेत. मयत व्यक्तींच्या वारसांच्यावतीने ऍड. दीपक अंधारी यांनी काम पाहिले.
2013 मध्ये चिऱयांच्या ट्रकला झालेल्या अपघातात माडय़ाचीवाडी येथील दादू जाधव, सुनील गावडे व महादेव परब यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या वारसांच्यावतीने मोटार अपघात वाद न्यायाधिकरण सिंधुदुर्गकडे भरपाईसाठी अर्ज करण्यात आला होता. त्यानुसार सुनील गावडे यांच्या वारसांना 9 लाख 65 हजार, दादू जाधव यांच्या वारसांना 8 लाख 65 हजार, तर महादेव परब यांच्या वारसांना 5 लाख एवढी भरपाई द्यावी, असे आदेश मोटार अपघात न्यायाधिकरण, सिंधुदुर्गने दिले. तिघांना मिळून 23 लाख 30 हजार भरपाई ट्रकची विमा कंपनी दी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीने अदा करावी, असे ठरविण्यात आले.









