प्रतिनिधी/चिपळूण
महिनाभरापूर्वी येऊन गेलेल्या महापुराच्या जखमा ताज्या असतानाच शनिवारी दुपारी केवळ तासभर कोसळलेल्या मुसळधार पावसाने शहरातील 4 रस्ते पाण्याखाली गेले. यामुळे काही काळ वाहतूकही ठप्प झाली. आकस्मिक घडलेल्या या प्रकाराने नागरिकांच्या पोटात भीतीचा गोळा निर्माण झाला. फक्त तासाभराच्या पावसाने काही भाग जलमय होत असेल तर दिवसभर पाऊस कोसळला तर काय अवस्था होईल, या काळजीत चिपळूणवासीय आहेत.
गेल्या जुलै महिन्यात अतिवृष्टीत वाशिष्ठी व शिवनदीला आलेल्या महापुरात शहर परिसराची मोठी आर्थिक आणि जीवितहानी झाली. बाजारपेठ पुरती उद्ध्वस्त झाली. हजारो नागरिकांना याचा फटका बसला. राज्याच्या कानाकोपऱयातून आलेल्या मदतीच्या जोरावर चिपळूणवासीय हळूहळू सावरत असतानाच शनिवारी अल्प काळ कोसळलेल्या पावसानेच तुंबलेल्या पाण्यामुळे मोठा धक्का बसला आहे. या प्रकारामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
शनिवारी दुपारी 1.30 वाजल्यापासून तासभर जोरदार पाऊस झाला. यामुळे शहरातील चिंचनाका ते मार्कडी मार्गावरील आईस फॅक्टरी, परकार कॉम्लेक्स, लोटिस्मामागील रस्ता आणि खेंड जाखमाता मंदिराकडील रस्त्यावर पाणी आले. या रस्त्यावर साधारण दीड ते दोन फुटापर्यत पाणी काही क्षणात आल्यानंतर काही ठिकाणी वाहतूकही विस्कळीत झाली. 22 जुलैला ज्या पध्दतीने पाणी वाढीचा वेग होता, त्याच पध्दतीने शनिवारी दुपारी पाणी घुसत होते. पाऊस थांबल्यानंतर तासाभरात पाणी ओसरले व नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
नगर परिषद प्रशासनालाही रस्त्यावर आलेल्या पाण्याचे नेमके कारण उमगलेले नाही. तेही आश्चर्यचकीत आहेत. मात्र प्राप्त माहितीनुसार शहरातील नाले, गटारे महापुरात आलेल्या कचऱयाने भरून गेले आहेत. शहरातील वर्दळीच्या भागातील कचरा, चिखल काढला गेला असला तरी नाले, गटारे अजूनही साफ केली गेलेली नाहीत. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास मार्ग न मिळाल्यामुळे पाणी त्या-त्या भागात तुंबले. असे असले तरी या प्रकाराने नागरिक मात्र धास्तावले आहेत. यापुढे अशा परिस्थितीत 24 तास पाऊस पडला तर पुन्हा घरादारांमध्ये पाणी शिरण्यास वेळ लागणार नाही, अशा काळजीत नागरिक आहेत.
नदीत कचरा, प्लास्टीक बाटल्यांचा खच
मुळातच शिव नदीला व वाशिष्ठी नदीलाही बऱयापैकी पाणी आले होते. मात्र या गढूळ पाण्यात कचरा आणि प्लास्टीक बाटल्यांचा खच होता. पूरग्रस्त चिपळूणमधील कचरा प्रकल्पात विल्हेवाटीसाठी गेला तरी नदीकाठच्या गावातील कचऱयाची विल्हेवाट कशा पध्दतीने लावली गेली, हे समोर आलेले नाही. नदीत वाहून आलेला कचरा आता नेमका कुठला, हे ही तपासणे यामुळे गरजेचे बनले आहे.