उंब्रज / प्रतिनिधी
तासवडे ता. कराड येथील एमआयडिसीतील रस्त्यावर चौकात अचानक दुचाकीने पेट घेतला. आगीत दुचाकी जळून खाक झाली असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान घटनास्थळी घरी परतणार्या कामगार व नागरिकांची मोठी गर्दी निर्माण झाली होती. सोमवार दि. १५ रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, आशियाई महामार्गावर तासवडे ता. कराड टोलनाक्यानजीक एमआयडीसीतील रस्त्यावरील हायवेजवळच्या मुख्य चौकात बजाज पल्सर दुचाकीने अचानक पेट घेतला. चालकाच्या लक्षात सदर बाब आल्यानंतर त्यांने दुचाकी रस्त्यावर सोडून दिली. क्षणार्धात भडका उडाल्याने दुचाकी जळून खाक झाली आहे. सायंकाळी एमआयडीसीतुन कामगार घरी परतत असताना ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. घटनास्थळी आगीच्या मोठ्या ज्वाळा निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे बघ्यांची गर्दी झाली. सदरची दुचाकी ही सागर तोडकर (रा. सैदापूर ता. कराड) यांची असल्याचे तळबीड पोलिसांकडून सांगण्यात आले.









