सलग दुसऱ्या वर्षी रथ नाही : मोरया..मोरया..च्या गजरात जीपमधून उत्सवमूर्ती ने-आण
प्रतिनिधी/तासगाव
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तासगावकरांचे श्रद्धास्थान श्री गणपती पंचायतनाचा 242 व्या प्रसिद्ध रथोत्सव सलग दुसऱया वर्षीही साधेपणाने साजरा करण्यात आला. `मंगलमूर्ती मोरया..गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात व मोरया..मोरया..च्या गजरात सजवलेल्या जीपमधून उत्सवमूर्तीची ने-आण करण्यात आली. नेहमी सुमारे चार तास चालणारा रथोत्सव यंदा अवघ्या 44 मिनिटात झाला.यावेळी चोख पोलीस बंदोबस्त तैनात होता. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार सुमनताई पाटील यांच्यासह अनेकांनी श्रींचे दर्शन घेतले.
पेशवाईतील प्रसिद्ध सरदार परशुरामभाऊ पटवर्धन यांनी हा सामूहिक व सार्वजनिक गणेशोत्सव 1799 मध्ये सुरू केला. गेली 240 वर्षे या उत्सवाचे सातत्य कायम असून या उत्सवातील प्रधान कार्यक्रम म्हणजे ऋषिपंचमीला होणारा रथोत्सव.
यादिवशी श्री गणेश आपल्या पिताजींना भेटण्यासाठी जातात. श्रींची 125 किलो वजनाची मिश्रधातूंची उत्स्वमूर्ती या रथामध्ये ठेवली जाते व काशिविश्वेश्वर मंदिरापर्यंत हा रथ गणेशभक्त हाताने ओढतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमिवर गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाच्या विनंतीनुसार पंचायतनचे विश्वस्त राजेंद्र पटवर्धन व आदिती पटवर्धन यांना रथोत्सव स्थगितीचा निर्णय घेतला. रथोत्सवदिनी पारंपरिक सर्व विधी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत करण्याचा निर्णय झाला.
शनिवारच्या रथोत्सवदिनाच्या नियोजनाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. सकाळपासूनच मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट केली होती. दुपारी एकच्या दरम्यान राजेंद्र पटवर्धन, आदिती पटवर्धन, सौ. सीतारादेवी पटवर्धन, सुहास शिंदे यांच्या वाहनातून कुटुंबियांसह मंदिरात आगमन झाले. मंदिरात श्रींची आरती झाल्यानंतर मोरयाच्या गजरात उत्सवमूर्ती पालखीतून मुख्यप्रवेशद्वारापर्यंत आणण्यात आली. येथे सजवलेल्या जीपमध्ये राजेंद्र पटवर्धन, आदिती पटवर्धन, व्यवस्थापक सुशिल थोरबोले यांच्या उपस्थितीत प्रतिष्ठापना केली. जीप रथगृहा समोर थांबवून तेथे श्रींची आरती व राष्ट्रगीत झाले.
दिवाजणी पेढे…ची मागणी घुमली
रथाचे दर्शन घेऊन काशीविश्वेश्वर मंदिराकडे ही जीप मार्गस्थ झाली. उपस्थित गणेशभक्तांनी मंगलमूर्ती मोरया..गणपती बाप्पा मोरया..चा जयघोष सुरु केला. `दिवाणजी पेढ…’ अशी मागणी गणेशभक्तांतून होत होती. पेढे मिळताच गणेशभक्त उत्साहात मार्गस्थ होत होते. मारूती मंदिर चौकात श्रींची आरती होऊन जीप पुढे मार्गस्थ झाली.यावेळी रस्त्याच्या दुर्तफा असलेल्या लोकांनी उत्सवमूर्तीवर पुष्पवृष्टी करून तेथून पूजन केले.तसेच काहींनी गुलालाची उधळण ही केली.
श्री काशीविश्वेश्वर मंदिरात आल्यानंतर उत्सवमूर्ती आत नेऊन पुन्हा श्रींची आरती झालली आणि उत्सवमूर्ती त्याच जीपमधून परतीच्या प्रवासाला निघाली. मारूती मंदिरनजीक श्रींची आरती होऊन श्रीगणेश मंदिराकडे जीप मार्गस्थ झाली. प्रवेशद्वाराजवळून पालखीतून उत्सवमूर्ती मंदिरात नेण्यात आली. रात्री उशीरा पारंपरिक पद्धतीने श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी श्रींचे दर्शन घेत `राज्यातील कोरोनाचे संकट दूर कर व महाराष्ट्राला लवकर कोरोनामुक्त कर’, असे साकडे घातले. आमदार सुमनताई पाटील यांनीही श्रींचे दर्शन घेतले. अपर अधिक्षक मनिषा दुबुले, तहसीलदार कल्पना ढवळे, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील, पोलीस उपअधीक्षक अश्विनी शेंडगे, निरीक्षक संजीव झाडे आदींनी श्रींचे दर्शन घेतले.
उत्सवमूर्ती सोबत विश्वस्त राजेंद्र पटवर्धन, आदिती पटवर्धन तसेच इतर कुटुंबिय, व्यवस्थापक सुशिल थोरबोले, प्रशांत उर्फ फंटू पैलवान,पुजारी अनंतशास्त्री जोशी,तसेच मानकरी धोत्रे बंधू,प्रा.एम.बी.पवार,अमोल शिंदे,कमलेश तांबेकर,राम माळी,आप्पा पाटील,सुभाष हिंगमिरे, महेश्वर हिंगमिरे, विनय शेटे,सचिन शेटे,खंडू कदम,राहुल शिंदे,अक्षय माईनकर आदींची उपस्थिती होती.
असा झाला 44 मिनिटांचा उत्सवमूर्तीचा प्रवास
दुपारी 1.30 वाजता सजवलेल्या जीपमध्ये उत्सवमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.1.33 वा.श्रींची आरती झाली, तेथून रथगृहासमोर आरती व राष्ट्रगीत होऊन 1.38 वा.उत्सवमूर्तीचा प्रवास सुरू झाला. 1.55 वा.काशीविश्वेश्वर मंदिरनजीक ही जीप पोहचली. 2.10 वाजता परतीचा प्रवास सुरू झाला. 2.22 वाजता उत्सवमूर्ती मंदिरासमोर आली.
चोख पोलीस बंदोबस्त व नेटके नियोजन
उत्सवमूर्ती मार्गावर गर्दी न होण्याबाबतची योग्य ती दक्षता पोलीस यंत्रणेने घेतली होती. पोलीस उपअधीक्षक अश्विनी शेंडगे यांचे नेतृत्वाखाली निरीक्षक संजीव झाडे यांच्यासह पाच अधिकारी व 325 पोलीस कर्मचारी असा चोख बंदोबस्त होता. अनेक ठिकाणी बॅरिगेटस् लावून अत्यंत नेटके असे नियोजन पोलीस यंत्रणेने केले.








