सांडपाण्याचा निचरा न झाल्याने परिसरात माती ढसतेय
प्रतिनिधी/ बेळगाव
ताशिलदार गल्ली येथे शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास एका घरामध्ये मोठा आवाज होऊन भगदाड पडले. या भगदाडामुळे गाय अडकली. तब्बल 15 फूट खोलीचे हे भगदाड पडले होते. दोन तासांच्या प्रयत्नांनी गायीला बाहेर काढण्यात आले. परिसरातील पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने माती ढासळत असून असे जीवघेणे प्रकार घडत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
रुक्मिणी जुवेकर यांच्या घरातील गोठय़ात हे भगदाड पडले. मोठा आवाज झाल्यामुळे भूकंप झाला की काय? असा प्रश्न घरातील नागरिकांना पडला. परंतु गोठय़ात खड्डा पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर अजून माती ढसू नये यासाठी दगड व 1 ट्रक्टर माती या खड्डय़ामध्ये भरण्यात आली.
शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसाने ताशिलदार गल्ली परिसरात फुटभर पाणी साचले होते. पाणी जाण्यास जागा उपलब्ध नसल्याने पाणी साचून राहत आहे. याचा परिणाम आजूबाजूच्या परिसरातील माती ढसू लागली आहे. अशीच माती ढासळत राहिल्यास अनर्थ घडण्याची शक्यता आहे.
प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका
चन्नम्मा चौकापासून उतारावरून पावसाचे सर्व पाणी थेट कपिलेश्वर उड्डाणपुलापर्यंत पोहचत आहे. शनिमंदिर जवळून पाण्याचा निचरा होण्यास जागा उपलब्ध नसल्याने मिळेल त्या ठिकाणी पाणी जात आहे. त्यामुळे ताशिलदार गल्ली परिसरात वारंवार पाणी साचत आहे. तसेच उड्डाणपुलाच्या एका बाजूने पाणी जाण्यास जागाच नसल्याने समस्या निर्माण होत आहे. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे सर्वसामान्यांचे जीव टांगणीला लागले आहेत.









