महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात व ताळगांव पंचायतीतर्फे अनेक उपक्रम
प्रतिनिधी / ताळगांव
ताळगांव पंचायतीतर्फे सामुदायिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून शनिवारी दुर्गावाडी व कार्दोजवाडो येथे उद्यानाच्या खुल्या आवारात अनेक भाज्यांच्या झाडांची लागवड करण्यात आली. यावेळी ताळगांवच्या आमदार तथा महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात, सरपंच आग्नेल डिकुन्हा, उपसरंपच रेघा पै व स्थानिक पंचसदस्य उपस्थित होते.
दुर्गावाडी येथे हार्मोनी उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले. भविष्यात येथे सामुदायिक शेती होणार आहे. ताळगांव भागात अशी अनेक उद्याने आहेत, ज्यांचा वापर अशाप्रकारे करणार आहोत. लोकांना याचा मोठय़ा प्रमाणात फायदा होणार आहे, असे मोन्सेरात यांनी सांगितले.
पंचायतीतर्फे शेती समृद्ध बनविण्यासंबंधी अनेक उपाययोजना नेहमीच राबविण्यात आल्या आहेत. हल्लीच सामुदायिक शेती विषयावर शेतकऱयांसाठी जागृती कार्यक्रम आयोजित केला होता. आजचा कार्यक्रम त्याचाच भाग आहे. ताळगांवातील कुणालाही अशाप्रकारे शेती करावयाची असल्यास पंचायतीकडून नेहमीच मदत मिळणार आहे, असे आग्नेल डिकुन्हा यांनी सांगितले. या कार्यक्रमादरम्यान मंत्री मोन्सेरात व सरपंच डिकुन्हा यांनी स्वतः भाज्यांचे बियाणे पेरून अनेकांना प्रोत्साहन दिले. भेंडी, काकडी, वाली यासारख्या भाज्यांचा त्यात समावेश आहे.









