कोरोना महामारीचे संकट असल्यामुळे मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पाडला सोहळा
वार्ताहर / किणये
तालुक्यात गुरुवारी शिवजयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. कोरोना महामारीचे संकट असल्यामुळे बेळगाव तालुक्यात विविध गावांमध्ये मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
कोरोनामुळे अनेक सार्वजनिक कार्यक्रमांवर प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढू नये व गर्दी होऊ नये म्हणून बेळगावच्या मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळातर्फे घरोघरीच शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. याप्रमाणे बहुतांशी गावांमध्ये गल्लोगल्ली व घरांमध्येच शिवजयंती साजरी करण्यात आली.
शिवजयंती साजरी करताना कार्यकर्त्यांनी
मास्कचा वापर केला होता. तसेच सामाजिक अंतर ठेवूनच पूजा व आरती करण्यात आली. तालुक्याच्या बहुतांशी गावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनारुढ, अश्वारुढ मूर्ती आहे. कार्यकर्त्यांनी बुधवारी सायंकाळपासूनच शिवजयंती सोहळय़ाची तयारी केली.
यंदाची चित्ररथ मिरवणूक रद्द
कोरोनामुळे कार्यक्रम साध्या पद्धतीने करण्यात आले. मात्र, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला. तालुक्यातही शिवजयंतीनिमित्त चित्ररथ मिरवणूक काढण्यात येते. यंदा ही मिरवणूक रद्द करण्यात आली आहे.
गुरुवारी सकाळी बहुतांशी गावांमध्ये शिवजयंती उत्सव साजरा केला. शिवरायांच्या मूर्तीला अभिषेक, विधिवत पूजा-अर्चा, आरती करण्यात आली. त्यानंतर तीर्थप्रसादाचे वाटप केले. पिरनवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवसेना तालुका प्रमुख सचिन गोरले, यल्लाप्पा शिंदे, सतीश पाटील आदींच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
गरजूंना अन्नधान्याचे वाटप
यावेळी डॉ. सुरज पुन्नुचे, विजयानंद नेसरकर, नारायण मुचंडीकर, किरण नेसरकर, विनायक उसुलकर, गौतम आपटेकर, मनोहर बिंदले आदी उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी शिवाजयंतीनिमित्त काही गरजूंना अन्नधान्याचे वाटपही करून एक वेगळा उपक्रम राबविला.
सावगाव येथे शिवजयंती
सावगाव येथील शिवस्मारक सेवा समिती, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व ग्रामस्थांतर्फे परंपरेनुसार होणारी शिवजयंती यंदा कोरोनामुळे साध्या पद्धतीने व कौटुंबिक पातळीवर घरी राहतच साजरी केली. पहाटे 5 वाजता प्रेरणामंत्राने कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करून विधिवत पूजा केली. गावातील तरुणी व कार्यकर्त्यांनी पाळणा गीत म्हटले. शेवटी ध्येयमंत्राने सांगता करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त शिवस्मारकाला आकर्षक फुलांनी सजविण्यात आले होते. यावेळी गावातील शिवरायांच्या होत असलेल्या नित्यपूजेसाठी गावातील शिवप्रेमींनी नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले.
हलगा येथे घरासमोरच शिवजयंती
लक्ष्मी गल्ली, हलगा येथील श्री शिवसेना शिवजयंती उत्सव युवक मंडळातर्फे गल्लीतील कार्यकर्त्यांच्या घरासमोरच शिवजयंती साजरी केली. पूजा करून शिवरायांचा जयघोष करण्यात आला. यावेळी अध्यक्ष मल्लाप्पा सामजी, प्रकाश कणबरकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
मंडोळीत साधेपणाने साजरी मंडोळी येथे कार्यकर्त्यांनी सामाजिक अंतर ठेवून शिवजयंती साजरी केली. प्रेरणा मंत्र म्हणून पाळणा गीत म्हटले. बहाद्दरवाडी येथील ब्रह्मलिंग मंदिरात शिवजयंती साजरी केली. पूजा करून तिर्थप्रसाद वाटला.









