सर्वत्र होता शुकशुकाट : पिरनवाडीतील कडक लॉकडाऊन यशस्वी, गावागावांमध्ये दुकाने बंद, शेतकरी पेरणीत व्यस्त

वार्ताहर / किणये
मागील आठवडय़ापासूनच प्रशासनातर्फे तीन दिवसांचा विकेंड कर्फ्यू लागू करण्यात आला. या विकेंड कर्फ्यूला तालुक्मयातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. प्रशासनाच्या आवाहनानुसार तालुक्मयातील गावागावांमध्ये सर्वप्रकारची दुकाने बंद ठेवून विकेंड कर्फ्यू यशस्वी करण्यात आला आहे.
शुक्रवार-शनिवार व रविवार या तीन दिवसांत विकेंड कर्फ्यूमुळे तालुक्मयाच्या मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट पसरला होता. सकाळपासूनच गावागावांमध्ये विविध प्रकारची दुकाने, व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते. ग्रामीण भागातील नागरिकांनीही विकेंड कर्फ्यूला साथ देत घरी राहणेच पसंत केले.
सध्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होऊ लागली आहे. याची जाणीव आता साऱयांनाच झाली आहे. यामुळेच ग्रामीण भागातील प्रत्येक लहान वा वयोवृद्ध प्रत्येकाच्या तोंडाला मास्क लावलेले निदर्शनास येत आहे. ग्रामपंचायती व आरोग्य खात्याच्यावतीने कोरोनाबाबत ग्रामीण भागात जनजागृती करण्यात येत आहे. आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी शिक्षिका व ग्रामपंचायत कर्मचारी घरोघरी जाऊन नागरिकांची विचारपूस करीत आहेत.
ग्रामीण भागातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी काही गावांमधील नागरिक स्वयंस्फूर्तीने कडक लॉकडाऊनही करू लागले आहेत. विकेंड कर्फ्यूनिमित्त शुक्रवार ते रविवार हे तीन दिवस पिरनवाडी, कंग्राळी, सांबरा, कडोली, हिंडलगा, बेळगुंदी, हलगा-बस्तवाड, येळ्ळूर आदी ठिकाणच्या मुख्य बाजारपेठाही बंद ठेवण्यात आल्या होत्या. विकेंड कर्फ्यू लागू केल्यामुळे गुरुवारीच जीवनावश्यक साहित्याची खरेदी नागरिकांनी केली होती.
विकेंड कर्फ्यूचा घेतला शेतकऱयांनी लाभ
विकेंड कर्फ्यू असला तरी खरीप हंगामासाठी शेतकरी मशागतीची कामे जोमाने करू लागले आहेत. मात्र, वळिवाच्या पावसामुळे या कामांमध्येही अडथळा निर्माण होऊ लागला आहे. रविवारी दुपारी पावसाने थोडी विश्रांती घेतली असल्यामुळे काही शिवारांमध्ये शेतकरी भातपेरणी करीत असतानाचे चित्र पहावयास मिळाले.
पिरनवाडीतील कडक लॉकडाऊन यशस्वी
पिरनवाडी गावात बुधवार दि. 2 जूनपासून रविवार दि. 6 रोजीपर्यंत कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. गावातील प्रमुख पंच व युवा कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने ग्रामपंचायतीमध्ये बैठक घेऊन हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बुधवारपासून सुरू करण्यात आलेला हा लॉकडाऊन यशस्वी झाला असून पाच दिवस गावातील नागरिकांनी सर्वप्रकारची दुकाने बंद ठेवली होती. तसेच गावातून कोणीही बाहेर गेले नाही व बाहेरील व्यक्ती गावात आल्या नाहीत.
सद्या पिरनवाडी परिसरात सर्दी, ताप, खोकला आदी संसर्गजन्य आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. आपल्या गावातून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने हा कडक लॉकडाऊन केला होता. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निर्णयाचे स्वागत करत नागरिकांनीही घरी राहून लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले आहे.









