बडेकोळ मठात रथोत्सव मिरवणूक जल्लोषात : गावागावात रुद्राभिषेकासह भजन, प्रवचन, कीर्तनादी कार्यक्रम : तारिहाळ-मास्तमर्डी येथील पालख्यांना उद्या निरोप
वार्ताहर /किणये
तालुक्मयात महाशिवरात्री उत्सवानिमित्त बुधवारी ठिकठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारपासून महाशिवरात्रीच्या उत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली होती. मंगळवारी व बुधवारी महारुद्राभिषेक, अभिषेक व इतर आध्यात्मिक कार्यक्रम झाले.
दोन दिवस शिवमंदिरांमध्ये भक्तांची मोठय़ा प्रमाणात गर्दी दिसून आली. दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. ‘हर हर महादेव’चा गजर झाला. भजन, प्रवचन, कीर्तन, निरुपण व जागर भजनाचे कार्यक्रम झाले.
बेळगाव शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात जागृत पावनक्षेत्र तारिहाळ येथे पावनक्षेत्र बडेकोळ मठ आहे. या मठात इ. स. 1934 पासून महाशिवरात्री यात्रोत्सव मोठय़ा उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येतो. आजही येथील परंपरा कायम टिकून आहे.
मठात आकर्षक रथोत्सव मिरवणूक

यावषी सोमवारपासून बडेकोळ मठात महाशिवरात्र यात्रोत्सवाला प्रारंभ झाला. दोन दिवस अभिषेक व इतर आध्यात्मिक कार्यक्रम झाले. बुधवारी या मठात रथोत्सव मिरवणूक काढण्यात आली.
बुधवारी सकाळी मठाधीश नागेंद्र स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली महारुद्राभिषेक करण्यात आला. त्यानंतर पाद्यपूजा करण्यात आली. नागेंद्र स्वामीजींच्या हस्ते रथोत्सव मिरवणुकीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ‘हर हर महादेव’च्या गजरात रथोत्सव मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. या मिरवणुकीत बेळगाव तालुक्मयासह खानापूर, बागेवाडी, कोल्हापूर, गोवा येथून भाविकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती. दुपारी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी उशिरापर्यंत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
आज जंगी कुस्त्यांचे आयोजन
गुरुवार दि. 3 रोजी दुपारी 3 वाजता बडेकोळ मठात जंगी निकाली कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि. 4 रोजी दुपारी 4 वाजता तारिहाळ व मास्तमर्डी येथील पालख्यांच्या निरोपाने या यात्रोत्सवाची सांगता होणार आहे.
नावगे येथील रामलिंग मंदिरात महाशिवरात्र यात्रोत्सवाची बुधवारी सांगता झाली. मंगळवारी सकाळी तसेच रात्री अभिषेक करण्यात आला. बुधवारी सकाळी अभिषेक व बुत्तीपूजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते.
बिजगर्णी येथील ब्रह्मलिंग मंदिरात बुधवारी सकाळी अभिषेक झाला. गावातील सर्व देवदेवतांचे पूजन करण्यात आले. दुपारी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. बहाद्दरवाडी येथील ब्रह्मलिंग मंदिरात मंगळवारी रात्री अभिषेक करण्यात आला.
अनेक गावांमध्ये बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत महाप्रसादाचे वाटप सुरू होते. रात्री विविध आध्यामिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
बसुर्ते महादेव मंदिर

बसुर्ते येथील महादेव मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासून या मंदिर प्रांगणात महाप्रसादाचे वितरण करण्यात येत होते. यावेळी भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
मंगळवार दि. 1 रोजी पहाटे अभिषेक आणि विधिवत पूजा आदी कार्यक्रम झाले. दिवसभर महिला मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला. रात्री प्रवचन, कीर्तन कार्यक्रमांबरोबर जागर भजन झाले. बुधवारी मंदिरमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पंच मंडळींनी या कार्यक्रमाचे शिस्तबद्ध नियोजन करून सर्वांना महाप्रसादाचे वितरण
केले.
उचगाव परिसर

येथील परिसरातील प्रसिद्ध रामलिंग देवस्थानमध्ये महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन मंगळवार दि. 1 आणि बुधवार दि. 2 रोजी करण्यात आले होते. बुधवारी महाप्रसादाने या महाशिवरात्री उत्सवाची सांगता झाली. मंगळवारी रात्री आणि दिवसभर महिला मंडळाचे भजन कार्यक्रम पार पडले. रात्री प्रवचन, कीर्तनाचा कार्यक्रम झाला. बुधवारी सकाळपासूनच मंदिराच्या प्रांगणात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गावातील भक्तांनी महाप्रसादाचा लाभ
घेतला.
कणबर्गी सिद्धेश्वर मंदिर

कणबर्गी येथे श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात महाशिवरात्रीनिमित्त आयोजित महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. प्रारंभी बुधवारी सकाळी 10 वाजता महाप्रसादाचे विधिवत पूजन झाल्यानंतर महाप्रसाद वाटपाला प्रारंभ करण्यात आला. महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी सिद्धेश्वर मंदिर परिसरात सकाळपासून भाविकांची गर्दी होती. यावेळी देवस्थान कमिटीने चोख व्यवस्था केली होती.
त्यामुळे भाविकांची चांगली सोय झाली. सायंकाळी उशिरापर्यंत महाप्रसादासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.अंदाजे चाळीस हजारहून अधिक भाविकांनी याचा लाभ घेतल्याचे देवस्थान कमिटीने ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले. यावेळी बेळगाव शहरासह कलखांब, मुचंडी, चंदगड, अष्टे, सुळेभावी, बाळेकुंद्री खुर्द, सांबरा, मुतगा, निलजी, बसवण कुडची, काकती, होनगासह तालुक्यातील व परगावचे भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
धामणेत महाप्रसादाने उत्सवाची सांगता

येथील कलमेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त मंगळवारी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही महाशिवरात्रीदिवशी सकाळी 6 वाजता कलमेश्वर मंदिरातील महादेवाच्या पिंडीला अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर विधिवत पूजन करण्यात आले. दुपारी 12 ते रात्री उशिरापर्यंत मंदिरात भजन कार्यक्रम झाला. बुधवार दि. 2 रोजी दुपारी 1 ते 4 पर्यंत महाप्रसाद वाटपानंतर महाशिवरात्री उत्सवाची सांगता झाली.
गोजगे महादेव मंदिरात महाप्रसाद

गोजगे येथील महादेव मंदिरमध्ये महाशिवरात्रीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. महाप्रसादासाठी भाविकांनी एकच गर्दी केल्याचे दिसून येत होते. मंगळवारी पहाटेपासून मंदिरमध्ये भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. दिवसभर भक्तांची वर्दळ सुरू होती.
रात्री भजन, कीर्तन, प्रवचन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी सकाळपासून महाप्रसाद वितरणास सुरुवात करण्यात आली. दिवसभर मंदिराच्या प्रांगणात भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
हिंडलगा येथील श्री कलमेश्वर मंदिरात महाप्रसाद

हिंडलगा येथील ग्रामदैवत श्री कलमेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त सालाबादप्रमाणे मंदिर जीर्णोद्धार कमिटी व ग्रामस्थांच्यावतीने बुधवार दि. 2 रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी यावेळी मोठय़ा संख्येने उपस्थिती दर्शविली होती.
महाशिवरात्रीनिमित्त श्री कलमेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम व सांप्रदायिक भजनी मंडळाचे भजन, कीर्तन आयोजित करण्यात आले होते. यानिमित्त मंदिरात विधिवत पूजन करून अभिषेक घालण्यात आला. मंगळवारी व बुधवारी हिंडलगा आणि परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी मोठय़ा संख्येने गर्दी केली होती. बुधवारी दुपारी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी श्री कलमेश्वर मंदिर जीर्णोद्धार कमिटीचे पदाधिकारी, ग्रा. पं. सदस्य, श्री महालक्ष्मी देवी यात्रोत्सव संघाचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.









