कर्नाटक सरकारचा निषेध : काळय़ादिनी गावागावांमध्ये धरणे आंदोलन करून पाळला कडकडीत हरताळ
वार्ताहर/ किणये
तालुक्यात रविवारी 1 नोव्हेंबर या काळय़ादिनी कडकडीत हरताळ पाळण्यात आला. कोरोनामुळे सायकलफेरी व मूक रॅलीला परवानगी दिली नाही. यामुळे गावागावांमध्ये धरणे आंदोलन करून 1 नोव्हेंबर या दिनाचा निषेध करण्यात आला. सीमाबांधवांवर सरकारने कितीही दडपशाही केली तरीही सीमाप्रश्न सुटेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असा ठाम निर्धार कार्यकर्त्यांनी केला.
बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणांनी तालुका दुमदुमून गेला होता. हातावर काळय़ा पट्टय़ा बांधून कार्यकर्त्यांनी आपला निषेध नोंदविला. तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्वयंस्फूर्तीने सर्व व्यवहार बंद ठेवून हा काळा दिवस पाळण्यात आला.
1 नोव्हेंबर 1956 साली मराठी बहुभाषिक सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आला. त्यानंतर लोकशाही मार्गाने सीमालढा सुरू आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून 1 नोव्हेंबर हा काळा दिवस म्हणून सीमाबांधव पाळतात. सीमावासियांवर अन्याय झाला असल्याचा निषेध करतात. सायकल फेरी व मूक रॅलीही काढण्यात येते. यंदा मात्र कोरोनामुळे सरकारने या सायकल फेरीला परवानगी दिली नाही.
कोरोना संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन तालुका म. ए. समिती, तालुका म. ए. समिती युवा आघाडी, म. ए. युवा समिती, तालुका म. ए. समिती महिला आघाडी आदींसह सीमाभागातील कार्यकर्त्यांनी आपापल्या गावांमध्ये राहून अगदी शांततेत आपल्या भावना व्यक्त केल्या. महाराष्ट्रात सामील होण्याची तळमळ कार्यकर्त्यांमध्ये दिसून आली.
स्वयंस्फूर्तीने सर्व दुकाने व व्यवहार बंद
सकाळी विविध गावांमध्ये स्वयंस्फूर्तीने सर्व दुकाने व व्यवहार बंद ठेवून गावातील, गल्लीमधील निषेध मोर्चात सहभाग दर्शविला. या लढय़ात आता चौथी पिढीही सक्रिय झाली असल्याने सीमालढय़ाला नक्कीच बळकटी मिळणार आहे.
तालुका म. ए. समिती हंगरगे विभागाच्यावतीने गावात धरणे आंदोलन करून सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी गावातील समितीची ज्येष्ठ नेतेमंडळी उपस्थित होती. त्यांनी हातावर काळय़ा फिती बांधल्या होत्या.
गेल्या 65 वर्षांपासून लोकशाही मार्गाने सीमाप्रश्नाचा लढा सुरू आहे. मात्र, सीमाबांधवांवर सातत्याने अन्याय, अत्याचार होत आहेत. सीमाप्रश्नाचा लढा अधिक तीव्र करण्याची गरज सध्या निर्माण झाली असून यासाठी आपण सर्वांनी या लढय़ासाठी प्रामाणिकपणे कार्य करणे गरजेचे आहे, असे मनोगत तालुका पंचायत माजी सदस्य कृष्णा हुंदरे यांनी व्यक्त केले.
यावेळी जि. पं. माजी सदस्य दिलीप कांबळे, मोनाप्पा चलवेटकर, सहदेव सावंत, लक्ष्मी मुतगेकर आदींची भाषणे झाली. कृष्णा पाटील, नारायण पाटील, परशराम पाटील, गावडू पाटील, यल्लुप्पा पाटील, शिवाजी पाटील, सहदेव सावंत, मनोहर शहापूरकर, मल्लाप्पा पाटील, महादेव सोनोलकर, भोमाणी पार्लेकर, रमेश मुतगेकर, बळीराम पार्लेकर, भैरू पाटील, लक्ष्मण सावंत, भरमा पाटील, बाबू सावंत, अशोक पाटील, प्रवीण नावगेकर, नेमाणी हुंदरे, नारायण चलवेटकर, बाळू चलवेटकर आदी उपस्थित होते.
मंडोळीत जाहीर निषेध

मंडोळी गावातही 1 नोव्हेंबर काळादिन पाळण्यात आला असून जाहीर निषेध करण्यात आला. आपल्या हक्कासाठी, आमच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही काळा दिवस पाळतो. सर्व तरुणांनी या समितीच्या लढय़ात सहभागी व्हावे, असे यल्लाप्पा कणबरकर यांनी सांगितले.
डी. एल. आंबेवाडीकर, नारायण दळवी, आनंद पाटील, पिराजी पाटील, परशराम गेणुचे, बंडू दळवी, केदारी कणबरकर, श्रीकांत बुवा, सचिन दळवी, शंकर गेणूचे, अर्जुन पाटील, रामा शिंदे, वैजू दळवी, यल्लाप्पा कदम, आप्पाजी दळवी, मंगेश दळवी, प्रशांत पाटील, संतोष पाटील, चंद्रकांत पाटील, नारायण दळवी, गोपी गोरल, यल्लाप्पा वाईंगडे, बाळू दळवी, वामन कणबरकर, मारुती हुंदरे, मारुती कणबरकर आदी उपस्थित होते.
किणये गावच्या वेशीत निषेध
किणये गावातील कार्यकर्त्यांनी गावच्या वेशीत जाहीर निषेधाचा फलक लावून आपला पाठिंबा दर्शविला. यावेळी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणाही देण्यात आल्या. जि. पं. माजी सदस्य सुरेश डुकरे, अनिल पाटील, शिवाजी पाटील, ता. पं. सदस्य आप्पासाहेब कीर्तने आदींची भाषणे झाली. सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र सरकारने आता जातीनिशी लक्ष घालून प्रयत्न करावेत, अशा भावना अनेक कार्यकर्त्यांनी बोलून दाखविल्या.
चंद्रकांत पाटील, महादेव गुरव, विठ्ठल वेताळ, शाहू दळवी, नारायण मुतगेकर, रावजी पाटील, महादेव गुरव, बाळू शिंदे, रामचंद्र पाटील, सातेरी गुरव, देवेंद्र हुंदरे, बाळू दळवी, गणपत पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
आता तरुणांनी सक्रिय भाग घेण्याची गरज

बेनकनहळ्ळी गावात तालुका म. ए. समिती व युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आपला निषेध व्यक्त केला. गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ासमोर उभे राहून बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणा दिला.
युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक यांनी सीमाप्रश्नाच्या आंदोलनात आता तरुणांनी सक्रिय भाग घेतला पाहिजे, असे मनोगत व्यक्त केले. या गावातील नागरिकांनी अगदी शांततेत काळादिन पाळला. यावेळी बाबाजी देसूरकर, आनंद पाटील, रामा पाटील, कृष्णा देसाई, परशराम पाटील, कल्लाप्पा देसूरकर, राजेश देसूरकर, नागेश देसूरकर, महेश पाटील, लक्ष्मण हिरोजी, लक्ष्मण पाटील, युवराज पाटील, रमेश हिरोजी, मल्लाप्पा हिरोजी, तुळसा पाटील, शांता पाटील, लक्ष्मी काटकर, भारता मंडलिक, शालन हिरोजी, गीता पाटील, रेणुका पाटील, रेखा पाटील, विठ्ठल पाटील, प्रभाकर देसूरकर, मारुती पाटील, दीपक देसूरकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.









