अवकाळीचा फटका धामणे, बस्तवाड, हलगा, नंदिहळ्ळी, देसूर भागाला : नुकसान भरपाईविरोधात शेतकऱयांच्या भावना तीव्र

वार्ताहर /धामणे
यंदा पावसामुळे शेतकऱयांच्या भातपिकांचे मोठे नुकसान झाले असून पुढील दोन-तीन वर्षे हे नकसान भरून न येण्यासारखे आहे. कारण भातपिकाची कापणी सुरू असतानाच परतीचा पाऊस पडण्याचे सत्र सुरू असून कधी ढगाळ वातावरण तर कधी मुसळधार पाऊस पडत असल्याने तालुक्मयातील सर्व शेतकरी हवालदिल झाले आहेत.
यंदा ऐन भातपीक कापणीच्या सुरुवातीलाच अचानक ढगाळ वातावरणामुळे पावसाला सुरुवात झाल्याने हतबल झालेल्या सर्व शेतकऱयांना नुकसानीला बळी पडावे लागले आहे. कारण काही शेतकऱयांनी कापून ठेवलेले भातपीक पाण्याखाली गेले आहे तर काही भातपिकांच्या गंजी पावसात सापडून सर्व गंज्यांतून पावसाचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे न कापता ठेवलेल्या भातपिकाची सराई गेल्याने उभ्या भातपिकाची लोंबे झडत असल्याने शेतातून पावसाचे पाणी साचले असून ते भात कुजत आहे. महिनाभर पावसामुळे शेतकऱयांच्या हातातोंडाला आलेले भातपीक खराब झाल्याने ओल्या दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे.शासनाकडून मात्र नुकसानीची भरपाई म्हणून प्रतिगुंठा 60 रुपये तुटपुंजी नुकसानभरपाई जाहीर करण्यात आल्याने शेतकऱयांकडून शासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. कारण कोरोना महामारीच्या सुरुवातीपासूनच म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून प्रत्येक पिकाचे नुकसान होत आहे. आता या भातपिकाच्या नुकसानीने शेतकरी मोठय़ा संकटात सापडला असताना शासनाकडून शेतकऱयांना भातपिकाच्या नुकसानीबद्दल तुटपुंजी नुकसानभरपाई जाहीर करून शेतकऱयांच्या या दुखण्यावर मीठ चोळण्याचा प्रकार करत असल्याचे शेतकऱयांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
धामणे, बस्तवाड, हलगा, नंदिहळ्ळी, राजहंसगड, देसूर, सुळगा (ये.), नागेनहट्टी भागातील शेतकऱयांना यंदा भातपिकाच्या नुकसानीचा मोठा फटका बसला आहे. या भागीतल भातपिकाची कापणी 40 टक्के झाली असली तरी 20 टक्के कापून ठेवलेले भातपीक पाण्याखाली राहून खराब झाले आहे. 20 टक्के भात गंज्यांमधून पावसाचे पाणी जाऊन भात उगवत आहे. त्यामुळे भाताच्या गंजी खराब झाल्या आहेत. त्यामुळे यंदाचे भातपिकाचे मोठे नुकसान झाल्याने या भागातील शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला असून शेतकऱयांना शासनाकडून मात्र तुटपुंजी नुकसानभरपाई जाहीर केल्याने या भागातील शेतकऱयांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
सरकारकडून तुटपुंजी भरपाई जाहीर

देसूर शिवारातील यंदा भातपीक चांगले बहरून आले होते. परंतु, ऐन सुगीत एक महिन्यापासून पडत असलेल्या पावसामुळे कापून घातलेल्या गंजीत पाणी शिरल्याने आमचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु, सरकारकडून तुटपुंजी नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली आहे. सरकारने ही भरपाई प्रतिगुंठय़ाला वाढवून देऊन शेतकऱयांना चांगले साहाय्य करावे.
– रवळू देवाप्पा पाटील, देसूर
निसर्गाकडून फार मोठा दगा

आम्ही शेतकरी कोणत्याही पिकाची पेरणी किंवा लागवड करत असताना निसर्गावर (देवावर) भरोसा ठेऊन शेतीचे काम करत असतो. परंतु, यावर्षी निसर्गानेच आम्हा शेतकऱयांना दगा दिल्याने यंदा भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु, नुकसानग्रस्त शेतकऱयांना सरकारकडून गुंठय़ाला 60 रुपये भरपाई देण्याचे जाहीर केल्यावर आम्ही कुणावर विश्वास ठेवायचा? याचा विचार करून सरकारने गुंठय़ाला 600 रुपये नुकसानभरपाई द्यावी.
– सिद्राय जाधव, नंदिहळ्ळी
मेहनतही गेली अन् खर्चही

यंदा ऐन भातपिकाच्या हंगामातच भात कापणीच्या सुरुवातीलाच पाऊस पडला आणि आम्ही भातपिकासाठी केलेली मेहनत आणि या पिकासाठी केलेला खर्च वाया गेला असून आम्हा शेतकऱयांना मोठे नुकसान झाले आहे. यासाठी नुकसानभरपाई म्हणून शासनाने तुटपुंजी नुकसानभरपाई जाहीर करून सर्व शेतकऱयांना नाराज केले आहे. शासनाने याचा फेरविचार करत शेतकऱयांना भरीव अशी नुकसानभरपाई द्यावी.
– नागेंद्र मल्लाप्पा गणेशाचे, धामणे









