वार्ताहर/ उचगाव
जून-जुलै महिन्यामध्ये घेण्यात आलेल्या एसएसएलसी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या बेळगाव तालुक्मयातील पाच परीक्षा केंद्रांवर 1839 विद्यार्थी सोमवार दि. 21 सप्टेंबरपासून 28 सप्टेंबरपर्यंत पुरवणी परीक्षा देणार आहेत.
कोरोनाच्या संकटामुळे यावषी तब्बल तीन महिने दहावीची वार्षिक परीक्षा उशिरा पार पडली. परीक्षाच रद्द होणार या भ्रमात विद्यार्थी होते. मात्र, 25 जूनपासून अखेर या परीक्षेला प्रारंभ झाला. तीन महिने उशिरा झाल्याने विद्यार्थ्यांची मनस्थिती बिघडली. अभ्यास झाला, मात्र तो विसरला गेला. कोरोनाची धास्ती अशा अनेक कारणांचा फटका विद्यार्थ्यांना बसला आणि यामध्ये तालूक्मयातील शाळांचे निकाल म्हणावे तसे लागले नाहीत.
आता तालुक्मयातील पाच परीक्षा केंद्रांवर यामध्ये हिंडलगा हायस्कूल हिंडलगा (271), कर्नाटक हायस्कूल हिरेबागेवाडी (572), एस. एस. हायस्कूल कडोली (287), न्यू इंग्रजी हायस्कूल मुतगे (259), डिव्हाईन मर्शी हायस्कूल मच्छे (450) या केंद्रांवर या परीक्षा होणार आहेत.
शुक्रवारी पार पडल्या बैठका
या पाचही केंद्रांवरून शुक्रवार दि. 18 रोजी मुख्याध्यापक तसेच पर्यवेक्षक यांच्या बैठका घेण्यात आल्या व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रप्रमुखांनी मार्गदर्शन केले. परीक्षेला बसणाऱया सर्व विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहण्यासाठी खबरदारी घेणे, सॅनिटायझर, मास्क यांचा सक्तीने वापर करणे, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करणे, प्रवास विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांसोबत करणे, पॉझिटिव्ह विद्यार्थी असेल तर तसे कळविणे याबाबत सूचना करण्यात आल्या.









