प्रतिनिधी/ बेळगाव
शुक्रवारी बेळगाव तालुक्मयातील उत्तर भागात जोरदार वारा व ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह वळीवाने चांगलेच झोडपले. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. जोरदार वाऱयामुळे हेस्कॉमचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे 8 खांब कोसळून 1 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे उघडकीस आले आहे. याचबरोबर झाडे व फांद्याही कोसळल्या आहेत.
पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. काही ठिकाणी विद्युत पोल व झाडांची पडझडही झाली आहे. अगसगा, कडोली व जाफरवाडी परिसरात विद्युत खांब कोसळले असून याच वादळाचा फटका एका तरुणालाही बसल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, पावसामुळे सर्वत्र फांद्या कोसळल्या होत्या. शेतातील विद्युत खांबही उन्मळून पडले होते.
गेल्या काही दिवसांपासून उष्म्यात मोठी वाढ झाली आहे. कोरोना आणि उष्म्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. सध्या विकेंड कर्फ्यु लागू करण्यात आला असून सर्वत्र शुकशुकाट पसरला आहे. मात्र, शुक्रवारी सायंकाळी जोरदार वाऱयामुळे उत्तर भागात मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱयांच्या शेतातील झाडे उन्मळून पडली असून त्यांचे नुकसान झाले आहे. उत्तर भागात जोरदार पावसाचे आगमन झाले. इतर ठिकाणी पावसाने हुलकाणी दिल्याचे दिसून आले. तासभर पावसाने चांगलेच झोडपले आहे. शुक्रवारी कडोली, अगसगा, जाफरवाडी, हंदिगनूर, बोडकेनट्टी, देवगिरी आदी भागात जोरदार पावसाने झोडपले आहे.
पावसापूर्वी आलेल्या जोरदार वाऱयामुळे अनेक गावांच्या मुख्य रस्त्यांवरच झाड कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाल्याचेही दिसून आले. येथील नागरिकांनी ते झाड बाजूला सारून ये-जा करण्यास वाट करून दिली. शिवारांतही मोठय़ा प्रमाणात झाडांच्या फांद्या कोसळल्या आहेत. अगसगा परिसरात 5, जाफरवाडी 2 व कडोली 1 आणि इतर परिसरात एक खांब कोसळला असून असे 8 खांब कलंडले आहेत. त्यामुळे हेस्कॉमलाही या वादळी वाऱयाचा फटका बसला आहे.
अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांनी बचाव करण्यासाठी आडोसा शोधण्याचा प्रयत्न केला. हा पाऊस काही भागात मशागतीसाठी फायदेशीर ठरला तर शेतात असणाऱया पिकांना याचा फटका बसणार आहे. या पावसामुळे शेतकरी सुखावले असले तरी अनेक नागरिकांना याचा फटका बसला आहे. सध्या शेतकरी शिवारातील गवत घराकडे आणून ठेवण्याच्या कामात गुंतलेला असतो. याचबरोबर शेणखतही शिवारात सोडण्यात येते. शेणखत टाकण्यासाठी शिवाराकडे गेलेले ट्रक्टरही या पावसामुळे शिवारातच अडकले आहेत. यामुळे शेतकऱयांची चांगलीच तारांबळ उडाल्याच्या घटना घडल्या आहेत.









