वीजबिल थकल्याने महावितरणची कारवाई
वार्ताहर / राजापूर
वीजबिल थकवल्याने राजापूर महावितरण कार्यालयाने राजापूर तालुका कृषी कार्यालय तसेच ग्रामीण रूग्णालयातील कर्मचारी निवासस्थानांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. वीजबिल थकीत असताना जिल्हाधिकाऱयांच्या सूचनेमुळे राजापूर ग्रामीण रूग्णालयाचा वीजपुरवठा मात्र खंडित करण्यात आलेला नाही. वीजबिलांची थकबाकी वाढल्याने महावितरण विभागाने आता जोरदारपणे थकित वीजबील वसुलीला सुरूवात केली आहे. अशातही वीजबिल न भरणाऱया ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरण विभागाने हाती घेतली आहे. राजापूर शहरात विविध शासकीय कार्यालये असून त्यामध्ये ठराविक कार्यालयांनीच वेळेवर वीजबिलाचा भरणा केला होता. तर अनेक कार्यालयांकडून थकित वीजबिलाचा भरणा होत नसल्याने अखेर विद्युत मंडळाने शहरातील शासकीय कार्यालयांचा विद्युत पुरवठा तोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर अनेक कार्यालयांनी हप्त्यावर थकीत बीलाची रक्कम भरायला सुरवात केली आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यालयांचा वीजपुरवठा नियमित ठेवण्यात आला आहे. मात्र तालुका कृषी कार्यालयासह राजापूर ग्रामीण रूग्णालयाकडून अद्याप थकीत वीजबिल भरण्यात आलेले नाही. त्यामुळे तालुका कृषी कार्यालयाचा विद्युत पुरवठा तोडण्यात आला आहे. तर राजापूर ग्रामीण रूग्णालयातील कर्मचाऱयांच्या निवासस्थानांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. कोरोना महामारीमुळे रूग्णालयाचा विद्युत पुरवठा जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार सुरू ठेवण्यात आल्याची माहिती येथील विद्युत वितरण विभागाच्यावतीने देण्यात आली.









