प्रतिनिधी / सातारा :
सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पेन्शनर्स अदालतींचे आयोजन करण्यात आले आहे. तालुकास्तरावर पेन्शन अदालत सुरु करण्यात आली आहे. याचा लाभ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.
सातारा जिल्हा परिषदेकडील विविध विभागातून सेवानिवृत्त होणाऱ्या पेन्शनर्स कर्मचाऱ्यांना पेन्शनविषयक येणाऱ्या अडचणी जिल्हा परिषद विविध विभागांकडून पेन्शनर्सना आवश्यक असणाऱ्या बाबी तसेच सेवानिवत्तीनंतरचे लाभाबाबत येणाऱ्या अडीअडचणी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन विषयक समस्यांचे निराकारणासाठी सातारा जिल्हा परषिदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
या पेन्शन अदालतीमध्ये तालुकास्तरावर महिन्यातून एकदा व जिल्हास्तरावर तीन महिन्यातून पेन्शन अदालतीचे आयोजन करण्याबाबत पेन्शनर्स संघटनेच्या मागणीनुसार पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. नोव्हेंबर 2021 महिन्याचे तालुकास्तरावर पेन्शन अदालती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. माण तालुका दि. 3 नोव्हेंबर, कोरेगाव तालुका दि. 3 नोव्हेंबर, खटाव तालुका दि.10, कराड तालुका दि. 10, वाई दि. 15, पाटण दि. 16, जावली दि. 17, फलटण दि. 22, खंडाळा दि. 22, महाबळेश्वर दि. 22, सातारा दि. 30 असे आयोजित करण्यात आले असल्याचे गौडा यांनी सांगितले.
या अदालतीमध्ये सेवानिवृत्तीनंतर मिळणारे लाभ म्हणजे अंशराशीकरण, उपदान, भविष्य निर्वाह निधी, रजा रोखीकरण, गटविमा इ. लाभांबाबत सेवानिवृत्तीधारकांच्या समस्यांचे निराकारण करण्यात येणार आहे. निवडश्रेणी, वरिष्ठ निवडश्रेणी यांच्या प्रलंबित प्रश्नावर चर्चा करण्यात येणार आहे. पेन्शन अदालतींसाठी संबंधित तालुक्यातील पेन्शनर्स संघटना व पेन्शनर्स यांनी उपस्थित राहून आपले अडीअडचणीचे निराकारण करावे, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी केले आहे.