मुंबई/प्रतिनिधी
ज्येष्ठ कवी, गीतकार जावेद अख्तर यांनी पुन्हा एकदा तालिबानचं समर्थन करणाऱ्या देशांना सुनावलं आहे. काही दिवसापूर्वी अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केली होती. यावरून मोठा वादंग निर्माण झाला होता. भाजपकडून जावेद अख्तर यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. आता जावेद अख्तर यांनी तालिबानला समर्थन देण्यास तयारी दाखवलेल्या कथित सभ्य आणि लोकशाही देशांना खडेबोल सुनावले आहेत. जगातील प्रत्येक लोकशाही प्रधान देशानं तालिबानला मान्यता देण्यास स्पष्ट नकार द्यायला हवा. तसंच अफगाणिस्तानातील महिलांवर अन्यायासाठी तालिबानचा कठोर निषेध करायला हवा, असं जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, जावेद अख्तर यांच्या विधानांमुळे अनेकदा वादही निर्माण होतात. अख्तरांनी याआधी देखील तालिबानचा कठोर शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. आता पुन्हा एकदा जावेद अख्तर यांनी ट्विट करत तालिबानी सत्तेला पाठिंबा देणाऱ्या देशांवर निशाणा साधला आहे. “प्रत्येक सभ्य व्यक्ती, लोकशाही प्रधान सरकार, जगातील प्रत्येक समाजानं तालिबान्यांना मान्यता देण्यास नकार द्यायला हवा. अफगाणिस्तानातील महिलांवरील अन्यायाबाबत सर्वच देशांनी निंदा केली पाहिजे अन्यथा न्याय, माणुसकी आणि विवेक असे शब्द विसरावे”, असं रोखठोक मत अख्तरांनी व्यक्त केलं आहे.
तालिबानी प्रवक्ता सय्यद झकीरुल्लाह यानं महिलांबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. याविधानाचा जावेद अख्तर यांनी समाचार घेतला होता. “तालिबानी प्रवक्त्यानं जगाला सांगितलं की महिला मंत्री बननण्याचा लायकीच्या नाहीत. त्या फक्त मुलांना जन्म घालण्यासाठी आणि घरी राहण्यासाठी आहेत. असं विधान करणाऱ्यांच्या सरकारला मान्यता देण्याची तयारी कथित लोकशाही प्रधान देशांनी केली आहे ही अतिशय लाजीरवाणी बाब आहे”, असं ट्विट जावेद अख्तर यांनी केलं होतं.