मुंबई \ ऑनलाईन टीम
सभागृहात गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांचं एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. पराग अळवणी, राम सातपुते, संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, शिरीष पिंपळे, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, किर्तीकुमार बागडिया यांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. यावर आशिष शेलार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
विधानभवनाबाहेर माध्यमांशी बोलाताना आशिष शेलार म्हणाले की, तालिबानी संस्कृतीला लाजवेल असं ठाकरे सरकार वागत आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या रुपाने नवे तालिबानी महाराष्ट्रावर राज्य करू पाहत आहे. भाजपाच्या कोणत्याही आमदाराने भास्कर जाधवांना शिवीगाळ केली नाही. तालिका अध्यक्षांना कुठेही धक्काबुक्की झाली नाही. ओबीसी आरक्षणात बोलू न दिल्याने संविधानिक त्रागा करणाऱ्या सदस्यांना जागेवर बसवण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी केली. उपाध्यक्षांच्या दालनात शिवीगाळ करणारे सदस्य भाजपाचे नव्हते. तरी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना असं वाटत असेल तर पक्षाच्या वतीने क्षमा मागतो असं आम्ही सांगितले. परंतु तालिबानी सरकारने आमच्या आमदारांवर कारवाई केली. सभागृहाबाहेर सत्ताधाऱ्यांची पळता भुई थोडी करू, असा इशारा आशिष शेलारांनी दिला आहे.
छगन भूजबळ यांनी मांडलेल्या ओबीसींना आरक्षणापासून दूर करण्याच्या भूमिकेला मी हरकतीचा मुद्दा म्हणून मी 10 मिनिटं भूमिका मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना चुकीचं कोट करण्यात आलं. त्यांच्यावर लांच्छण लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावर माझी हरकत होती. मी केवळ ओबीसीच्या आरक्षणासाठी हरकतीचा मुद्दा मांडला. मी पंतप्रधानांच्या सन्मानाची लढाई लढतोय. म्हणून मी सदस्यांना शांत करुन, सदस्यांच्या वतीने क्षमा मागून सुद्धा माझ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली, असं देखील आशिष शेलार यांनी सांगितलं.
संसदीय कामकाजमंत्री अनिल परब यांनी मांडलेल्या ठरावाला विधानसभेत मंजुरी मिळाल्यानंतर तालिका अध्यक्ष असलेल्या भास्कर जाधव यांनी निलंबनाची घोषणा केली. या निलंबनाला एकतर्फी असल्याचा उल्लेख करत तसेच लोकशाहीचा खून करण्यात आल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सातत्याने विरोधी पक्ष म्हणून आम्ही सरकारवर हल्ला करतो म्हणून विरोधी पक्षाचा नंबर कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याचेही फडणवीस म्हणाले.








